नवी दिल्ली 02 जुलै : राज्यातील राजकारणात मागील जवळपास १० दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. राज्यातील राजकारणामध्ये हा निर्णय जातीय समिकरणांचा विचार करुन घेण्यात आल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान आता एकेकाळी काँग्रेसला अशाच पद्धतीने खिंडार लावणारे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनीही महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलताना याचा उल्लेख केला आहे.
हैदराबादच्या भाजपा बैठकीत फडणवीसांची सर्वाधिक चर्चा, पक्षाला द्यावं लागलं स्पष्टीकरण
एकनाथ शिंदे हे मराठा असल्याचा उल्लेख करत ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की 'मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती. अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला. मला विश्वास आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ पुन्हा महाराष्ट्रात विकास सुरु करेल.”
एकनाथ शिंदेंप्रमाणेच ज्योतिरादित्य शिंदेंनीही केलेली बंडखोरी -
एकनाथ शिंदेंप्रमाणेच ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळेस आता महाराष्ट्रातील आमदारांप्रमाणेच शिंदेंसोबतचे समर्थक आमदारही पक्षातून बाहेर पडले होते. यानंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पडलं होतं. शिंदे गटाच्या समर्थनावर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. मात्र शिंदेंनी राज्य सरकारमध्ये कोणतंही पद घेतलं नव्हतं. परंतु नंतर त्यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी तसंच केंद्रीय मंत्रीपदही दिलं.
'काय झाडी, काय डोंगार' फेम आमदार होणार का पर्यटन मंत्री? का भाजपकडून गेम?
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून यात जातीय समिकरणाचा अँगलही बराच चर्चेत आहे. ब्राह्मण महासंघानेही याबाबत रोष व्यक्त करत निवेदन जारी केलं. यात लिहिलं होतं की "पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी नितीन गडकरींचं चारित्र्यहननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडादौड अडवण्याकरिता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवत आहे. भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं एक सुनियोजित कारस्थान चाललेलं निदर्शनास येत आहे", असंही यात म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.