मुंबई, 05 जुलै: मुंबई, ठाण्यासह उपनगरात शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं अक्षरश: धुमशान घातलं. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शनिवारी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापुरात पावसानं जोर धरल्यानं नदी-नाल्यांना पूर आला होता.
ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.उत्तर कोकणात रेड अलर्ट, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडेल मराठवाड्यात आज पाऊस दडी मारणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दिल्लीतही वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसानं रात्रीपासून थैमान घातलं आहे. पुढचे 3 दिवस दिल्लीत पावसाचा जोर कायम राहिल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
हे वाचा-सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरचा वाद, राज ठाकरेंनी केला ‘हा’ मोठा खुलासा
हे वाचा-कोरोनाचा महाराष्ट्राला हादरा, 24 तासांत 7074 नवे रुग्ण, संख्या गेली 2 लाखांवर
पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. एकीकडे कोरोनाचं संकट असताना मुसळधार पाऊस आणि त्यामुळे रस्त्यांवर साठणारं पाणी अशा दोन्ही परिस्थितीचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये पावसाचा जोर येत्या 24 तासात कायम राहिल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.