नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आर्थिक संकटाशी लढा देणाऱ्या लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) निर्बंध आणले होते. त्यानंतर आरबीआयने LVB डीबीएस इंडियामध्ये विलीन करण्याची घोषणा केली होती. कॅबिनेटने देखील आरबीआयच्या या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. 27 नोव्हेंबर अर्थात उद्यापासून हे विलीनीकरण लागू होणार आहे. यानंतर लक्ष्मी विलास बँकेचे नाव बदलून डीबीएस बँक होईल. या मंजुरीनंतर लगेचच आरबीआयने LVB वर लागू करण्यात आलेला मोरेटोरियम (Moratorium) हटवला आहे.
बँकेच्या 20 लाख ठेवीदारांवर होणार असा परिणाम
लक्ष्मी विलास बँकेच्या आधी रिझर्व्ह बँकेने येस बँक (YES Bank) आणि पीएमसी बँकेवर (PMC Bank) देखील निर्बंध आणले होते. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर लक्ष्मी विलास बँक सिंगापूरच्या सर्वात मोठ्या बँक डीबीएस बँकेच्या भारतीय शाखेत विलीन होईल. लक्ष्मी विलास बँक वाचविण्यासाठी आरबीआयने डीबीएस इंडियाबरोबर विलीनीकरणाचा मार्ग निवडला आहे. बुडण्यापासून वाचवण्यासाठी प्रथमच भारतीय बँकचे एखाद्या विदेशी बँकेत विलीनीकरण केले जात आहे.
(संबधित-DBS India मध्ये लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणास कॅबिनेटची मंजुरी)
या निर्णयामुळे 20 लाख ठेवीदार आणि बँकेच्या 4000 कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) म्हणाले. याशिवाय बँकेच्या खात्यातून जास्तीत जास्त 25 हजार रुपये काढण्याची मर्यादाही दूर करण्यात आली आहे. शुक्रवारपासून या बँकेचे ग्राहक डीबीएस इंडिया बँकेचे ग्राहक म्हणून आर्थिक व्यवहार करू शकतात. बेलआउट पॅकेज अंतर्गत लक्ष्मी विलास बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे मिळतील. जर ते बँकेत त्यांचे पैसे यापुढेही ठेवू इच्छितात तर ते देखील सुरक्षित राहतील, असा दिलासा देण्यात येत आहे.
(हे वाचा-भारतामध्ये मोफत असेल Google Pay,या देशामध्ये मनी ट्रान्सफर सेवेसाठी लागणार शुल्क)
जावडेकर यांनी अशी माहिती दिली की, विलीनीकरणानंतर लक्ष्मी विलास बँकेच्या कर्मचाऱ्यांना देखील चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. बँकेच्या 4000 कर्मचाऱ्यांची सेवा देखील सुरक्षित करण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी असे म्हटले की बँकेची आर्थिक स्थिती बिघडवणाऱ्यांवर मात्र कारवाई केली जाईल. यावर्षातील लक्ष्मी विलास बँक ही दुसरी बँक आहे ज्या बँकेला आरबीआयने बु़डण्यापासून वाचवले आहे. याआधी RBI ने मार्चमध्ये YES बँकेला बुडण्यापासून वाचवले होते. गेल्या 15 महिन्यातील LVB ही तिसरी बँक आहे.
सिंगापूर सरकार समर्थित डीबीएस बँक लक्ष्मी विलास बँकेत 2500 कोटींची गुंतवणूक करेल अशी योजना आहे. याअंतर्गत लक्ष्मी विलास बँकेच्या 560 शाखांच्या माध्यमातून डीबीएस बँक LVB च्या होम लोन, पर्सनल लोन आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री लोन घेणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचेल.
(हे वाचा-तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची विक्री करण्याचा विचार करताय? द्यावा लागेल कर)
DBS India मध्ये लक्ष्मी विलास बँकेचे विलीनीकरण झाल्यानंतर या करारानुसार डीबीएस इंडियाला LVB च्या 563 शाखा, 974 एटीएम आणि रिटेल बिझनेसमध्ये 1.6 अब्ज डॉलरची फ्रँचायझी मिळेल. यानंतर 94 वर्ष जुन्या आणि खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या लक्ष्मी विलास बँकेचे नाव संपूष्टात येईल आणि बँकेची इक्विटी देखील संपेल. या बँकेचे संपूर्ण डिपॉझिट DBS इंडियाकडे जाईल. दरम्यान बँकेच्या शेअर होल्डर्सना पैसे मिळणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.