मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोशल मीडियावर कसे कमावतात बक्कळ पैसे; Social media stars नीच सांगितलं सिक्रेट

सोशल मीडियावर कसे कमावतात बक्कळ पैसे; Social media stars नीच सांगितलं सिक्रेट

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

सोशल मीडियात यशस्वी व्हायचा विचार करत असलात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  मुंबई, 27 जानेवारी : सध्याच्या काळात सर्वांचा सोशल मीडियाकडे कल वाढत आहे. सोशल मीडियाकडे मनोरंजन आणि कनेक्ट राहण्याचं साधन म्हणून पाहिलं जातं. यामुळे गेल्या काही वर्षांत फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि ट्विटर युझर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे ही स्थिती असताना, दुसरीकडे या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा मिळवत असलेल्यांची संख्याही मोठी आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरच्या युझर्सची रील्स आणि स्टोरी पाहिल्यावर `मीदेखील असं करू शकतो,` असं तुम्हाला वाटत असेल. सोशल मीडियामुळे अनेक सर्वसामान्य व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. सोशल मीडिया हे आता केवळ प्रसिद्धी मिळवण्याचं नाही, तर कमाईचं साधन बनलं आहे. आज अनेक यू-ट्यूबर्स आणि एन्फ्लुएन्सर्स या माध्यमातून कोट्यधीश बनले आहेत. या नवीन मायानगरीत यशस्वी व्हायचा विचार करत असलात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पैसा आणि प्रसिद्धी कशी मिळवायची याबाबत प्रसिद्ध यू-ट्यूबर्स आणि एन्फ्लुएन्सर्स काय म्हणतात, हे जाणून घेऊ या. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  इन्स्टाग्राम रील्स असोत अथवा यू-ट्यूब व्हिडिओज, ते पाहिल्यानंतर मीदेखील असं करू शकतो, असं अनेकांच्या मनात येतं. सोशल मीडियामुळे आज अनेक अनोळखी चेहरे नावारूपाला आले आहेत. हा प्लॅटफॉर्म अनेक लोकांसाठी कमाईचं माध्यमदेखील बनला आहे. एका व्हिडिओतून मला लाख रुपये मिळाले असं कोणी सांगतं, तर कोणी कोट्यवधी रुपये मिळाल्याचं सांगतं. या नवीन मायानगरीतले ऐकलेले असे किस्से खरे आहेत. हे किस्से ऐकल्यानंतर अनेक तरुण-तरुणी यात करिअरच्या संधी शोधत आहेत. यात कोणाला प्रसिद्धी हवी आहे, तर कोणाला पैसा.

  हे वाचा - मोबाईल नंबर कोणालाही न दाखवता करा कॉल, कसं? ही ट्रिक करेल मदत

  आजच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या जमान्यात सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर बनण्याचं स्वप्न अनेकांचं आहे. त्यातच यू-ट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म्सनी नवी वाट खुली केली आहे. या माध्यमातून कमाई होऊ शकते असा विचार दशकभरापूर्वी स्वप्नवत होता. जे चमकतं ते सर्व सोनं नसतं, सोशल मीडियातलं आयुष्यही असंच काहीसं आहे. आज ब्रँड्समुळे अनेक जण प्रसिद्धीच्या झोतात आहेत. उद्या काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही; मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे यशस्वी कंटेट क्रिएटर बनणं सोपं काम नाही. त्याचप्रमाणे सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरसाठी यशस्वी होणं म्हणजे काय असतं हादेखील प्रश्नच आहे. इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सवर एका दिवसात लाखोच्या संख्येने सबस्क्रायबर्स होत नाहीत. यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. या प्लॅटफॉर्मवरची प्रत्येक व्यक्ती लाखो रुपये कमावते आणि आरामात आयुष्य जगते, असं प्रत्येकाला वाटतं; पण या नवीन मायानगरीचं वास्तव नेमकं कसं आहे, त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागलं हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा नियमित वापर करणाऱ्या युझर्सना सलोनी गौर हे नाव नक्कीच माहिती असेल. सलोनी कॉमेडी कंटेट क्रिएट करते. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तिचा सुरुवातीचा प्रवास खडतर होता. त्याविषयी सलोनीने माहिती दिली आहे. ती म्हणाली, `मी पहिल्यांदाच माझ्या आई-वडिलांपासून दूर राहत होते आणि ही गोष्ट माझ्यासाठी सोपी नव्हती. कॉलेजमध्ये मैत्री करणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. त्यादरम्यान मला सोशल मीडिया अ‍ॅप्सबद्दल माहिती मिळाली. पहिल्यांदा स्मार्टफोन मिळाल्यावर मी त्याविषयीच्या सर्व गोष्टी जाणून घेतल्या. कंटेट क्रिएटर होण्याचा मार्ग मला माझ्या भावाने दाखवला. त्यानंतर विनोद केवळ मित्रांना न सांगता त्याचे व्हिडिओ बनवून ते इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा मी निर्णय घेतला. मला आठवतं, आमच्या हॉस्टेलमध्ये एक टीव्ही होता आणि मुलांमध्ये आवडीचं चॅनेल बघण्यावरून वाद होत असत. त्या वेळी आमच्याकडे मनोरंजनाचं दुसरं साधन नव्हतं. त्या वेळी आपणच काही तरी करायचं असा विचार मी केला.`

  हे वाचा - तुम्ही देखील फोनच्या सेफ्टीसाठी कव्हर लावता का? पण ते फोनसाठी सेफ नाही तर अनसेफ

  `सुरुवातीला या क्षेत्रासाठी माझ्याकडे कोणताही प्लॅन नव्हता. मी फक्त माझी पॅशन फॉलो करत होते. त्यानंतर मी थोडंसं धाडस करून माझं अकाउंट सार्वजनिक केलं आणि 2019 मध्ये माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे माझी पॅशनमधून कमाई सुरू झाली. कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून पैसे कमावणं ही सोपी गोष्ट नसते,` असं सलोनीने सांगितलं.

  `इन्स्टाग्रामसाठी कंटेट क्रिएट करण्याबाबत मी फारसं नियोजन केलं नव्हतं. इतकंच काय, तर या माध्यमातून करिअर होऊ शकतं याची मला कल्पनाही नव्हती. मी माझा पहिला व्हिडिओ 2017मध्ये बनवला. त्या वेळी केवळ यू-ट्यूब व्हिडिओज मॉनेटाइज होतात, असा माझा समज होता. इन्स्टाग्रामवरच्या जाहिरातींच्या माध्यमातून माझी पहिली कमाई झाली. त्यानंतर ब्रँड कोलॅबोरेशन होऊ लागलं आणि हळूहळू उत्पन्न वाढू लागलं,` असं सलोनीने सांगितलं.

  यू-ट्यूबवर महेश केशवाला याचं अकाउंट खूप चर्चेत असते. Thugesh या नावानं महेशचं यू-ट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलचे 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. महेश त्याच्या प्रवासाविषयी सांगतो, `2015-16मध्ये मी भुवन बाम यांचे व्हिडिओज पाहत होतो. त्यातूनच मला वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आणि मी माझं चॅनेल सुरू केलं; मात्र सुरुवात फारशी चांगली नव्हती. मी सुरुवातीला अनेक गोष्टी करून पाहिल्या. मीम्स असोत अथवा टॉप 10 प्लेसेस टू व्हिजिट, अशा अनेक प्रकारचे कंटेंट तयार केले. मी यू-ट्यूबवर काय करतोय हे घरातल्यांना सांगायचं धाडस नव्हतं; पण मी व्हिडिओ बनवणं सुरू ठेवले. सुमारे एक वर्षानंतर मला यातून पैसे मिळाले. माझी पहिली कमाई 20 हजार रुपये होती. ही पाच महिन्यांची कमाई होती, जी रोज चार ते पाच तास काम करण्यासाठी पुरेशी होती.`

  हे वाचा - तुमच्या फोनमध्ये ही सेटिंग ऑन तर नाही ना? नाहीतर कंपनी ऐकतेय तुमच्या गप्पा

  यू-ट्यूबवर श्लोक श्रीवास्तव हे नाव खूप लोकप्रिय आहे. ही लोकप्रियता एका दिवसात मिळालेली नाही. यू-ट्यूब असो वा इन्स्टाग्राम या दोन्हींवर फॉलोअर्स वाढण्यासाठी खूप वेळ लागतो. श्लोकने सांगितलं, `यू-ट्यूबर, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर किंवा कंटेंट क्रिएटर बनणं हे माझं स्वप्न नव्हतं. मी माझे मित्र, कुटुंब आणि ओळखीच्या लोकांना तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगण्याकरिता यू-ट्यूब व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. हे व्हिडिओ बनवत असताना, मी नेहमीच कंटेंट चांगला असेल याकडे लक्ष दिलं. माझी टीम आणि प्रेक्षकांमुळेच माझं 'टेक बर्नर' हे चॅनेल यशस्वी झालं आहे. लोकांना माझे व्हिडिओ केवळ सातत्य, सापेक्षता आणि प्रामाणिकपणामुळे आवडतात, असा माझा विश्वास आहे.`

  `कॉलेजच्या दिवसांत मी व्हिडिओ बनवण्यासाठी वडिलांचा लॅपटॉप वापरत असे. कालांतराने कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं हे मी शिकलो आणि मग तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने मांडू लागलो. सुरुवातीच्या चार वर्षांत माझ्या फॉलोअर्सची संख्या पाच हजारांपर्यंत होती. आज दर महिन्याला माझ्या व्हिडिओला पाच कोटींपर्यंत व्ह्यूज मिळतात. या सगळ्या गोष्टींना भरपूर वेळ लागला. सुरुवातीपासून मी शिकणं आणि व्हिडिओ बनवणं कायम ठेवलं,` असं श्लोक सांगतो.

  `यू-ट्यूबवर बऱ्यापैकी रीच झाल्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. आज माझ्या व्हिडिओत अ‍ॅपल, सॅमसंगसह अनेक लहान-मोठ्या ब्रँडच्या प्रॉडक्ट्सचा समावेश असतो. अनेक कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट रिव्ह्यूसाठी पाठवतात; पण त्यांच्या व्हिडिओत स्क्रिप्ट किंवा रिव्ह्यू त्यांच्या स्वतःच्या असतात,` असं श्लोक श्रीवास्तवने सांगितलं.

  हे वाचा - WhatsApp वर डिलीट केलेला मेसेज कसा मिळवायचा? ही सोपी ट्रीक करेल मदत

  `यू-ट्यूब किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कमाई करणं हे अनेकांना खुणावतं; पण प्रत्येकाला ही गोष्ट साध्य होतेच असं नाही. अन्य क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातही सातत्यानं काम करावं लागतं. एक यशस्वी कंटेंट क्रिएटर होण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. सातत्याने नवीन प्रयोग करा, सातत्य ठेवा आणि प्रामाणिक रहा, असा सल्ला मी नवी क्रिएटर्सना देईन. तुम्ही आज जी स्वप्नं पाहत आहात, या माध्यमातून तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल,` असं सलोनी गौरने सांगितलं.

  `एक टॉक शो बनवण्याचं माझं स्वप्न होतं. तो आज माझ्याकडे आहे; पण मोठ्या निर्मात्यांशी संपर्क नसणे आणि मोठ्या बजेटचा अभाव या समस्या होत्या. नवीन असलात, तर तुम्हाला या क्षेत्रात काही काळ धीर धरावा लागेल. इतरांना तुम्हाला ओळखू द्या. कोलॅबोरेशनसाठी नेटवर्किंग महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमचे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या पुरेशी आहे असं तुम्हाला वाटेल तेव्हा काही तरी नवीन सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं समजा,` असं महेश केशवालाने सांगितलं.

  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कंटेट क्रिएटर्स अनेक मार्गांनी कमाई करतात. दोन कंटेंट क्रिएटर्स दोघांच्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्यासाठी आपले व्हिडिओज कोलॅब करतात. काही वेळा हे कोलॅबोरेशन पेड असतं. याशिवाय अनेक ब्रँड्स कंटेंट क्रिएटर्सशी पेड प्रमोशनसाठी संपर्क करतात. काही क्रिएटर्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या अफिलिएशन लिंक्सच्या माध्यमातूही कमाई करतात. एखादा कंटेट क्रिएटर लोकप्रिय झाला, त्याला चांगली प्रसिद्धी मिळू लागली तर त्याचं सर्व काम एखादी एजन्सी करते. कंटेट क्रिएटर्सची कमाई आणि रीच वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या अनेक एजन्सीज आज आहेत. यासाठी या एजन्सीज पैसे घेतात. बहुतांश क्रिएटर्ससाठी या एजन्सीज कोलॅब, ब्रँड्स प्रमोशन आणि कमाईचे अन्य मार्ग शोधण्याचं काम करतात.

  यू-ट्यूब असो वा इन्स्टाग्राम किंवा इतर कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, यातून कमाईचा प्राथमिक स्रोत म्हणजे मॉनेटायझेशन होय. परंतु. यासाठी कोणत्याही युझर्सना काही आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतात. यू-ट्यूबवर कमाई करण्यासाठी कोणत्याही युझरकडे किमान 1000 सबस्क्रायबर्स हवेत. तसंच गेल्या वर्षभरात त्याच्या चॅनेलवर 4000 वॉच अवर्स झालेले असावेत. त्याचप्रमाणे चॅनेल मॉनेटाइझ करण्यापूर्वी प्लॅटफॉर्म अन्य गोष्टींचीदेखील शहानिशा करतो. यात तुमचे व्हिडिओज आणि चॅनेलने कम्युनिटी गाईडलाइन्स फॉलो केल्या आहेत का हेदेखील पाहिलं जातं. टर्म ऑफ सर्व्हिस, कॉपीराइट, गुगल अ‍ॅडसेन्स प्रोग्राम पॉलिसी आणि अन्य धोरणांबाबतही तपासणी केली जाते. त्यानंतर चॅनेल मॉनेटाइज केलं जातं. इन्स्टाग्रामवरही मॉनेटायझेशनच्या अनुषंगाने काही अटी असतात. त्यात तुमचं बिझनेस अकाउंट असलं पाहिजे ही महत्त्वाची अट असते. याशिवाय फॉलोअर्ससह अनेक गोष्टी मॉनेटायझेशनपूर्वी तपासल्या जातात.

  हे वाचा - गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर सावधान! होऊ शकते फसवणूक

  कोणत्याही कंटेंट क्रिएटरसाठी हा प्रवास सोपा नसतो. अन्य करिअरप्रमाणे या क्षेत्रातही विकास होण्यासाठी सातत्य गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओज बनवणं बंद करता किंवा सातत्य संपतं, त्या दिवशी तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाता. या बिझनेसचा अल्गोरिदम याच पद्धतीने काम करतो.

  First published:

  Tags: Facebook, Instagram, Money, Social media, Technology