Home /News /money /

Budget 2022: तुमच्या पासपोर्टमध्ये असणार आता अशी 'चिप'; वाचा अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेल्या E-Passport विषयी

Budget 2022: तुमच्या पासपोर्टमध्ये असणार आता अशी 'चिप'; वाचा अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेल्या E-Passport विषयी

Budget 2022: देशाच्या डिजिटल करन्सीच्या घोषणेसह ई-पासपोर्टची (E-Passport) महत्त्वपूर्ण घोषणाही या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: आज सादर करण्यात आलेल्या 2022 -23 साठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात (union Budget-2022) अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. या केंद्रीय अर्थसंकल्पात भविष्यातल्या डिजिटल भारताचं प्रतिबिंब स्पष्ट उमटलेलं दिसलं. देशाच्या डिजिटल करन्सीच्या घोषणेसह ई-पासपोर्टची (E-Passport) महत्त्वपूर्ण घोषणाही या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. नागरिकांना 2022-23 या वर्षामध्ये ई-पासपोर्ट देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या ई-पासपोर्टमुळे परदेशात प्रवास करणं अधिक सोपं आणि जलद होईल, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. इलेक्ट्रॉनिक चिप (Electronic Chip) बसवलेले ई-पासपोर्ट सादर करण्याची योजना या महिन्याच्या सुरुवातीलाच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (Foregien Affairs Ministry) सादर केली होती. पासपोर्ट सेवांमध्ये नवीन वैशिष्ट्यं आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलं होतं. अर्थसंकल्पात या सुविधेला मूर्त रूप लाभल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात ई-पासपोर्टची कल्पना 2017 साली मांडण्यात आली. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय नागरिकांना चिप-आधारित ई-पासपोर्ट जारी करण्याबाबतचं काम प्रगतिपथावर असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तब्बल 20,000 अधिकृत आणि राजनैतिक ई-पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. मोबाईइल फोनसारख्या उपकरणांमध्ये सेव्ह करता येणारे डिजिटल पासपोर्ट सादर करण्याचीही सरकारची योजना आहे. तसंच ई-पासपोर्टच्या पुढच्या टप्प्यात चिपमध्ये फिंगरप्रिंट्ससारख्या बायोमेट्रिक डेटासह पासपोर्टधारकाचा फोटोदेखील संग्रहित करण्याची योजना आहे. हे वाचा-अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार पॉझिटिव्ह; Sensexमध्ये 900 अंकाची वाढ, Nifty 17600 वर न्यूज 18 डॉट कॉमनं ( News18.com) यापूर्वी याबाबत दिलेल्या वृत्तात ई-पासपोर्ट प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) मानकांनुसार हा ई-पासपोर्ट तयार केला जाईल. हे नवीन ई-पासपोर्ट सुरक्षित बायोमेट्रिक डेटावर (Biometric Data) आधारित असतील. या ई-पासपोर्टच्या बुकलेटमध्ये एक एम्बेड केलेली चिप असेल. या मायक्रोचिपमध्ये पासपोर्टधारकाचं नाव, जन्मतारीख आणि इतर तपशील यांसारखी माहिती असेल. त्यावर डिजिटल स्वाक्षरी केली जाईल आणि ती या चिपमध्ये असेल. 64 किलोबाइट्स स्टोरेज स्पेस आणि एम्बेडेड अँटेनासह येणाऱ्या या चिपमध्ये सुरुवातीला 30 आंतरराष्ट्रीय ट्रिप्सचा डेटा असेल. या ई-पासपोर्टमुळे इमिग्रेशन काउंटरसमोर (Emmigration Counter) लांब रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही. इमिग्रेशन काउंटरवर काही मिनिटांत हा ई-पासपोर्ट स्कॅन केला जाईल. या चिपमध्ये काही घोटाळा करण्याचा प्रयत्न झाल्यास, अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली ते शोधण्यास सक्षम असेल. परिणामी पासपोर्ट प्रमाणीकरण अयशस्वी होईल. त्यामुळे पारंपरिक पासपोर्टच्या आधारे सहजगत्या तयार केल्या जाणाऱ्या बनावट पासपोर्ट निर्मितीलाही आळा बसेल. हे वाचा-Digital Rupee : RBI कडून लॉन्च केली जाणारी डिजिटल करन्सी कशी असेल? ई-पासपोर्ट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप कॉन्टॅक्टलेस इनलेच्या खरेदीकरिता सरकारने नाशिकच्या भारतीय सुरक्षा प्रेसला (ISP) परवानगी दिली असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ही खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच पासपोर्ट निर्मिती आणि वितरणाचं काम सुरू होईल. तसंच पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची (TCS) निवड करण्यात आली आहे. ई-पासपोर्टसाठीचं आवश्यक तंत्रज्ञान टीसीएस आणणार असून, पासपोर्ट पुस्तिका मंजूर करणं किंवा छपाई करणं ही कामं सरकारतर्फेच केली जातील. अर्थात ई-पासपोर्टमुळे पासपोर्ट पूर्णपणे कागदमुक्त दस्तऐवज होणार नाही. कारण व्हिसा स्टॅम्पिंग त्याच्या पानांवरच होणार आहे. परंतु शक्य असेल तिथे ऑटोमेशनद्वारे कागदाची गरज नक्कीच कमी होईल, असं टीसीएसचे वरिष्ठ अधिकारी तेज भाटला यांनी सांगितलं. जगात सध्या अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसह 120 हून अधिक देशांमध्ये बायोमेट्रिक ई-पासपोर्ट प्रणाली आहे. आता या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होणार आहे. परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ई-पासपोर्ट सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एके काळी पासपोर्ट काढणं म्हणजे एक कठीण काम मानलं जात असे; मात्र गेल्या काही वर्षांत देशातल्या छोट्या शहरांमध्येही पासपोर्ट कार्यालयं सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना अगदी सुलभ प्रक्रियेद्वारे पासपोर्ट मिळण्याची सोय झाली आहे. आता या ई-पासपोर्ट सुविधेमुळे या सुविधेतला पुढचा टप्पा गाठला गेला आहे.
First published:

Tags: Budget, Nirmala Sitharaman, Travel by flight, Union budget

पुढील बातम्या