पुणे, 6 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिंदे आणि ठाकरे असे दोन गट आमनेसामने आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चांगलाच तणाव बघायला मिळतोय. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी काल दसरा मेळाव्याचं निमित्त साधत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली. दसरा मेळावा झाल्यानंतरही शिवसेना आणि शिंदे गटात टीका-टीप्पणीचं राजकारण सुरु आहे. या राजकीय घडामोडी एकीकडे सुरु असताना सोशल मीडियावर सध्या एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. शिंदे आणि ठाकरे परिवाराच्या दिलजमाईची ही पत्रिका आहे. विशेष म्हणजे एकीकडे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं असताना शिंदे-ठाकरे कुटुंबियांच्या दिलजमाईच्या पत्रिकेमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळतंय. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय, दसरा मेळाव्याची चालू असलेली राजकीय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा दररोजचा सामना पहायला मिळत असताना जुन्नर तालुक्यातील एका लग्नपत्रिकेने साऱ्या पुणे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. या लग्न पत्रिकेवर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांकडून लग्नपत्रिका वाचून शिंदे आणि ठाकरे कुटुंबांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्याच्या राजकारणातील शिंदे आणि ठाकरेंमध्ये फूट पडली. पण जुन्नर तालुक्यात ठाकरे आणि शिंदे कुटुंबाची दिलजमाई आली. दोन्ही कुटुंबांच्या घरी या निमित्ताने आनंद नांदताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. ( 100 कोटींचं ड्रग्ज, तस्कराची कल्पकता अधिकाऱ्यांनी ठेचली, मुंबई विमानतळावर मोठी कारवाई ) जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक श्री खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा यांचा शुभविवाह 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणातही लग्नपत्रिका पाहून चेहर्यावर आनंद पहायला मिळत आहे. त्यामुळे चांगलीच करमणूक होत आहे एवढं मात्र नक्की!
राजकारणातील शिंदे-ठाकरे एकत्र येतील का? महाराष्ट्राच्या राजकाणात कधी काय घडेल हे सांगता येणार नाही. गेल्या काही महिन्यांमधील घडामोडी तर हेत सांगत आहेत. विशेष म्हणजे त्याची सुरुवात तर अडीच वर्षांपूर्वीच झाली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. पण राजकारणातील हीच अनिश्चितता कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करुन एकमेकांवर सडकून टीका केली असली तरी भविष्यात कदाचित ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र आले तर त्याचं नवल वाटायला नको. कारण राजकारणात त्या त्या वेळची परिस्थिती महत्त्वाची असते. पण ती वेळ आता लगेच येणं सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे पुण्यातील शिंदे-ठाकरे कुटुंब एकत्र आले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील शिंदे-ठाकरे गटाची दिलजमाई केव्हा होईल हे सांगण सध्यातरी कठीण आहे.