मुंबई, 18 ऑक्टोबर : शिवसेनेनंतर आता विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस फोडणार असल्याचा धक्कादायक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. एका वृत्त वाहिनीशी बोलताना पवार कुटुंब फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं रोहित म्हणाले. या वक्तव्यानंतर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पण, असं होऊ शकतं का? यासाठी आपल्याला पवार कुटुंब जाणून घ्यावं लागेल. महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच पवार कुटुंबांच्या भोवती फिरतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर कोणी कितीही टीका केली तरी, पवार कुटुंबाभोवती असणारं वलय काही कमी झालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पवार कुटुंबात गृहकलह असल्याची चर्चा सुरू झाली होती.
घरातच राजकारणाचा वारसा
शरद पवार हे कुटुंबातील पहिले राजकारणी आहेत, असा अनेकांचा समज आहे. पण, शरद पवार यांच्या आई या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रीय नेत्या होत्या. शरद पवार यांना राजकारणाचे धडे घरातून मिळाले. गोविंद पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण 11 मुलं. 7 मुलं आणि 4 मुली. त्यातले फक्त शरद पवारच राजकारणात सक्रिय उतरले. बाकीच्यांनी शेती, वकिली, शिक्षण, उद्योग अशा विविध नाव कमावलं.
गोविंदराव आणि शारदाबाईंची मुले क्रमाने अशी,
वसंतराव पवार
दिनकरराव (आप्पासाहेब) पवार
अनंतराव पवार
माधवराव (बापूसाहेब) पवार
सूर्यकांत पवार
सरला (जगताप) पवार
सरोज (पाटील) पवार
शरद पवार
मीना (जगधने)
प्रताप पवार
नीला (सासणे)
वसंतराव पवार हे ख्यातनाम वकील होते. कोर्टातील एका प्रकरणात त्यांचा खून झाला. आप्पासाहेब शेती व्यवसायात अग्रेसर होते. त्यानंतरचे माधवराव हेदेखील व्यावसायिक होते. सूर्यकांत पवार हे नगररचनाकार होते. ते विदेशात स्थायिक झाले. शरद पवारांनी राजकारणात खूप मोठी झेप घेतली. भावांमध्ये सर्वांत धाकटे प्रताप पवार. ते इंजिनीअरिंग आणि वृत्तपत्र व्यवसायात आहेत. सरलाताई (जगताप), सरोजता (पाटील), मीना (जगधने), नीलाताई (सासणे) आपापल्या कुटुंबात व्यस्त आहेत. सरोजताईंचा विवाह, ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्याशी झाला.
तिसऱ्या पिढीचं राजकारण
शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातून अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात आले. सुप्रिया सुळे थोड्या उशिरा राजकारणात उतरल्या. मात्र, त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने कुटंबात कोणतेही मतभेद झाले नाहीत, असं पवार कुटुंबीय सांगतात. सुप्रिया सुळे दिल्लीत तर, अजित पवार यांनी राज्यात राजकारणावर पकड मिळवली. पुढे आप्पासाहेबांचे चिरंजीव राजेंद्र यांचा मुलगा रोहितही राजकारणात आला. सध्या ते कर्जत-जामखेडचे आमदार आहेत. रोहित राजकारणात असताना, अजित पवार यांचा मुलगा पार्थही राजकारणात उतरला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. त्यातल्या पार्थनं गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून निवडणूक लढवली. पण, पार्थचा पराभव झाला. हा पराभव पवार कुटुंबासाठी मोठा धक्कादायक होता, अस बोललं गेलं.
वाचा - शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
पार्थच्या उमेदवारीवरुन मतमतांतरे
'पवार कुटुंबीयांनीच सगळ्या जागा लढविल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचे?' असा परखड सवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. पार्थ यांच्या उमेदवारीस शरद पवार अनुकूल नसल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, त्यानंतरही पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळीही पवार कुटुंबात धुसफूस सुरू असल्याची चर्चा झाली होती.
रोहित पवार चर्चेत का?
रोहित हे पवार कुटुंबात तिसऱ्या पिढीचे राजकारण करतात. आप्पासाहेब आणि त्यांचे चिरंजीव राजेंद्र यांनी कृषी व्यवसायात लक्ष दिले. कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल आप्पासाहेबांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता. पुढे त्यांची धुरा रोहित पवार यांनी सांभाळली. रोहित जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात आले. त्यांनी अनेक संस्थांची पदे भूषवली आहेत. विशेष म्हणजे आजोबा शरद पवार यांच्या सोबत ते नेहमी दिसतात. अनेकदा पत्रकार परिषदेतही ते पवारांच्या सोबत दिसतात. त्या तुलनेत पार्थ यांचं पवारांसोबत सार्वजनिक कार्यक्रमात क्विचितच पाहायला मिळाले आहे.
पार्थ कुठे आहेत?
मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी चर्चेत आलेले पार्थ पवार सध्या कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात दिसत नाही. सोशल मीडियावरही ते जास्त सक्रीय नाहीत. अनेकदा रोहित आणि पार्थ यांची तुलना केली जाते. अजित पवार यांनाही या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र, त्यावर त्यांनी विशेष काही उत्तर दिलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Rohit pawar, Sharad Pawar