मुंबई, 22 जून : शिवसेना (Shivsena) आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराने मला समोर येऊन सांगावं, मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. केवळ मुख्यमंत्रीपदच नाही, तर मी शिवसेना पक्षप्रमुखपदाचाही राजीनामा देण्यास तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. “समोर येऊन माझ्याशी संवाद साधा. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. मुख्यमंत्रीपद माझ्याकडे अनपेक्षितपणे आलं. मला या पदाचा अजिबात मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मी तुम्हाला मुख्यमंत्रीपदी नको, तर मला ते समोर येऊन सांगा. अगदीच संकोच वाटत असेल तर मला एक कॉल करून सांगा, मी हे पद सोडून देईन. एवढंच नाही, तर कोणताही शिवसैनिक माझ्या समोर येऊन म्हणूदे की तुम्ही पक्षप्रमुखपदीही नको, मी तेही सोडायला तयार आहे. मी आता वर्षा सोडून मातोश्रीवर जातो, फक्त माझ्या समोर येऊन बोला”, अशी भावनिक साद त्यांनी बंडखोर आमदारांना घातली. बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं तुम्हाला खूप काही दिलंय- फेसबुक लाईव्ह दरम्यान जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर उत्तर दिली. ते म्हणाले की, अनेकजण म्हणतात की ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. परंतु शिवसेनेनं हिंदुत्वापासून कधीही फारकत घेतली नाही. 2012 साली बाळासाहेब गेल्यानंतर 2014 साली अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपण विधानसभा निवडणूकांना सामोरे गेलो. त्यानंतर शिवसेनेला जे मिळालं, ती बाळासाहेबांनंतरचीच शिवसेना होती. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, अनेकजण मंत्री आहेत, हीसुद्धा बाळासाहेबांनंतरचीच शिवसेना आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हेही वाचा- बंडखोरांनी सांगावं, राजीनामा देण्यास तयार, वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 इमोशनल मुद्दे उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यांना केला स्पर्श- - हिंदुत्व हा शिवसेना श्वास. शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. असं काय केलं की हिंदुत्वापासून दूर गेलो असं वाटलं? आधीही शिवसेना हिंदुत्त्ववादी आताही हिंदुत्ववादीच आहे.
-सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळालं ते बाळासाहेबांनीच दिलं. मला सत्तेचा मोह नाही.-आपल्या माणसांना शोधावं लागणं ही कसली लोकशाही? -शरद पवारांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. प्रशासननंही मला सांभाळले -काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. आजच कमलनाथ यांच्यासोबत माझं बोलणं झालं. हेही वाचा- एकनाथ शिंदेंची बंडखोरी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, सर्व आमदारांना महत्त्वाचा मेसेज -माझ्याच लोकांना मी मुख्यमंंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे. -आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो. -शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे. -शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच आहे. -मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे.