Home /News /mumbai /

एकनाथ शिंदेंची बंडखोरी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, सर्व आमदारांना महत्त्वाचा मेसेज

एकनाथ शिंदेंची बंडखोरी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, सर्व आमदारांना महत्त्वाचा मेसेज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

    मुंबई, 22 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्या आमदारांना मी मुख्यमंत्री हवा नसेल तर राजीनामा देतो, असं थेट सांगितलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर देखील भाष्य केलं. मी माझ्या राजीनाम्याचं पत्र (Resignation Letter) तयार करुन ठेवलंय. समोरासमोर येऊन बोला. मी राजीनामा देईन, असा मेसेज मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. "ज्या शिवसैनिकांना वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे. मी लगेच माझं मु्ख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुखपदही सोडायला देखील तयार आहे. पण हे सांगायला विरोधक नाही. असं सांगणारे फडतूस लोकं खूप आहेत. मी त्यांना बांधिल नाही. मी शिवसैनिकांना बांधिल आहे. त्यांनी सांगावं मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे. पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदाने मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा", असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? "कोरोना काळात प्रसंग बाका होता. मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. कोणीही या प्रसंगाला तोंड देऊ शकलेलं नव्हतं, मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. मला जे करायचं होतं ते मी प्रमाणिकपणाने केलं. त्यादरम्यानच्या काळात जे सर्व्हे होत होते त्यामध्ये देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची गणणा केली गेली. मी आज कोविडचा विषय घेऊन आलेलो नाही. काही मुद्दे आपल्यासमोर येत आहेत. शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का? मुख्यमंत्री भेटत का नाही? मुख्यमंत्री भेटत नव्हते. मुख्यमंत्री म्हणजे मी. हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी माझी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरची दोन-तीन महिने हे फार विचित्र होते. मी कुणाला भेटू शकत नव्हतो. म्हणून त्या काळात मुख्यमंत्री भेटू शकत नाही ते बरोबर होते. मी माझी पहिली कॅबिनेट मीटिंगही रुग्णालयातून अटेन्ड केली होती", असं उद्धव ठाकरे म्हणाले. (राजीनाम्याचं पत्र तयार; हिंदुत्वाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?) "शिवसेना आणि हिदुत्वाची घट्ट नाळी आहे. शिवसेना कदापि हिंदुत्वाशी आणि हिंदुत्व शिवसेनेसोबत दूर होऊ शकत नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. म्हणून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि काही आमदार-खासदार अयोध्येला जावून आले. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं हे आता बोलण्याची वेळ नाही. शिवसेना कुणाची आहे? काही जण असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. मी असं काय केलंय की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर चालली आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले. "माझ्यासोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे सहकारी आहेत ते बाळासाहेबांच्या काळातीलच सहकारी आहेत. मधल्या काळामध्ये जे काही मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा. सध्या राज्यात काय चाललं आहे. राज्यातील काही शिवसेनेचे आमदार गायब. गेले कुठे? पहिले सुरतला गेले नंतर गुवाहाटीला गेले. आता त्यातील काही आमदारांचे आम्हाला फोन येत आहेत. मला त्याच्यामध्ये जायचं नाही. काल-परवा जी निवडणूक झाली. त्या निवडणुकीनंतर आमदार हॉटेलमध्ये होते. तेव्हा मी ज्यांना आपण आपलं मानतो, शिवसैनिक मरमर राबतात निवडून देतात आणि आपल्याच माणसाला एकत्र ठेवावं लागतं. मध्येच कुणीतरी गायब होतं. बाथरुमलाही गेलं तरी शंका. अशी लोकशाही मला आवडणारी नाही", असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदे यांना सेनेच्या 45 पक्षाही जास्त आमदारांचं समर्थन मिळताना दिसत आहे. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेनाच हायजॅक केली का? असा सवाल उपस्थित केला जातोय. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक घडामोडी सुरु होत्या. बंडखोरांना परत बोलवण्याचे शर्तीने प्रयत्न सुरु होते. काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले गेले. यामध्ये शिंदे यांचं गटनेता पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तो निर्णय अवैध असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. याशिवाय शिवसेनेकडून प्रतोद देखील बदलण्यात आला आहे. तो निर्णयही शिंदे यांनी तांत्रिक गोष्टींचं कारण देत अवैध असल्याचं म्हटलं आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर येत आपली भूमिका मांडली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Maharashtra News, Maharashtra politics, Shiv sena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या