Raj Thackeray: "मातोश्री बंगला हा काय मशीद आहे का?" राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला सवाल
Raj Thackeray: "मातोश्री बंगला हा काय मशीद आहे का?" राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला सवाल
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा बोलण्याचा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याला राज ठाकरेंनी सुनावले
Raj Thackeray: मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याचा राज ठाकरेंची खरपूस समाचार घेतला आहे.
पुणे, 22 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) बोलण्याचा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याचा राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेत मनसैनिकांना हनुमान चालिसा लावण्यास सांगितले. त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा बोलण्याचं आव्हान दिलं. त्यावरुन मुंबईत मोठा गदारोळ झाला. याच मुद्यावरुन राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला चांगलेच सुनावले आहे.
राज ठाकरेंनी म्हटलं, राणा दाम्पत्य... मी सांगितलं काय होतं की, जर मशिदीबाहेर जोरात भोंगे वाजले तर त्याच्यासमोर हनुमान चालिसा लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचं बोलू लागले. आणि मग ते इतकं प्रकरण झालं की, त्यांना अटक झाली. मग ते जेलमध्ये होते... मग ते मधू इथे चंद्र तिथे... या सर्व गोष्टींनंतर ते एकत्र आले त्यांना सोडून देण्यात आलं.
शिवसेनेकडून त्यांना बोलण्यात आलं ते सुद्धा शिवसेनेविरोधात बोलत होते. इतका सर्व राडा तुम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेत काम करणारे लोक आहेत... जे शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत त्यांना या सर्व गोष्टींचं काहीच वाटत नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
वाचा : अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा, राज ठाकरेंनी सांगितलं दौरा स्थगित करण्यामागचं कारण
जी लोकं मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचायला आले ज्यांच्यामुळे इतकं प्रकरण घडलं आणि त्यांच्यासोबत तुम्ही तिकडे लडाखमध्ये फिरताय, त्यांच्या खांद्यावर हात टाकून बोलताय, त्यांच्यासोबत जेवताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व फक्त पकपक इतकंच आहे. यांना दुसऱ्या गोष्टी नकोयत असंही राज ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवरही निशाणा
त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय सुरू आहे कळतंच नाही. आमचं खरं हिंदुत्व, त्यांचं खोटं हिंदुत्व... वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही... तुम्हारी कमीज हमारी कमीज से सफेद कैसी. प्रश्न असा आहे ना की, खरं हिंदुत्व काय आहेत याचे रिझल्ट हवे आहेत.. जे आम्ही देत आहोत. महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो असंही राज ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.