मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nanded Violence: नांदेड हिंसाचारप्रकरणी 300 जणांवर गुन्हे दाखल, पोलिसांकडून अटकसत्र सुरू

Nanded Violence: नांदेड हिंसाचारप्रकरणी 300 जणांवर गुन्हे दाखल, पोलिसांकडून अटकसत्र सुरू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Police in action mode: राज्याच्या विविध भागात शुक्रवारी हिंसाचार झाला. त्यानंतर आता पोलिसांनी धडक कारवाई करत अटकसत्र सुरू केलं आहे.

नांदेड, 13 नोव्हेंबर : त्रिपुरात घडलेल्या अत्याचाराच्या (Tripura violence) घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध भागांत शुक्रवारी निषेध मोर्चा काढण्यात आले. मात्र, या निषेध मोर्चाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. नांदेडमध्ये सुद्धा काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान दगडफेक (Stone pelting in Nanded) झाली. याप्रकरणी आता नांदेड पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

नांदेडमध्ये शुक्रवारच्या (12 नोव्हेंबर) हिंसाचारबाबत इतवारा पोलीस स्टेशनमध्ये 250 जणांवर कलम 307 आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिवाजीनगर येथे दगडफेक प्रकरणी 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही आरोपीना ताब्यात घेतले आहे. सध्या नांदेडमध्ये शांतता असून कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. जनजीवन पुर्वपदावर आले आहे.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींना अटक

सीसीटीव्ही आणि इतर फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले. रझा अकादमीने बंद पुकारू नये असे आवाहन पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. पण तरीही बंद पुकारण्यात आल्याचे पोलीस अधिक्षकानी सांगितले. निदर्शने करण्याची परवानगी देखील देण्यात आली नव्हती. देगलूर भागात मोठा जमाव जमत असल्याची माहिती मिळाली. जमावाकडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली होती. त्यामुळेच त्याठिकाणी ऐनवेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. पोलिसांनी दक्षता घेतल्यानेच परिस्थिती लवकर आटोक्यात आल्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.

वाचा : 'महाराष्ट्राला आग लावायची आणि मग राज्य करता येत नसल्याची बोंब मारायची', संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

अमरावतीत बंदला हिंसक वळण, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड

शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आजा अमरावती बंदची (Amravati bandh) हाक देण्यात आली होती. अमरावती शहर बंदला हिंसक वळण (violence during Amravati bandh) लागल्याचं पहायला मिळालं. जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला गालबोट लागलं होतं. या मोर्चाला हिंसक वळण आलं तर गाड्या व 20 ते 25 दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून आज अमरावती शहर बंदचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले होते. याच बंद दरम्यान आज हिंसाचार झाल्याचं पहायला मिळत आहे.

वाचा : त्रिपुरात जे घडलंच नाही, त्याची प्रतिक्रिया दुर्दैवी! दंगलीबाबत फडणवीसांचे सरकारला सवाल

"समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार" - दिलीप वळसे पाटील

अमरावतीत जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी प्रतिक्रिया देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाने आज अमरावती बंदची हाक दिली होती. हा बंद शांततेत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने त्यात अप्रिय घटना घडल्या आहेत. मालमत्तेचं नुकसान झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हटलं, विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यंसोबत सुद्धा चर्चा केली आहे. त्यांनाही विनंती केली आहे की, आपलं राज्य महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने शांतता राहील यासाठी सहकार्य करा. अमरावतीत शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करा.

आज राज्यातील सर्व भागांत शांतता आहे. अमरावतीत एक घटना घडली आहे आणि तेथील परिस्थितीत लवकरच नियंत्रणात येईल. समाजात द्वेष निर्माण करणारं किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

First published:

Tags: Crime, Nanded