औरंगाबाद, 13 नोव्हेंबर : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. याच्या निषेधार्थ आज अमरावतीत भाजपने बंदची हाक दिली. मात्र, या बंदलाही हिंसक वळण लागलं. अमरावतीत जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड (Violence during Amravati Bandh) करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आज महागाईच्या विरोधात औरंगाबादेत शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा (Shiv Sena aakrosh morcha in Aurangabad) काढला होता. या मोर्चात संजय राऊत यांनी भाषण करताना भाजपवर हल्ला चढवला. संजय राऊत म्हणाले, त्रिपुरात काही झालं आणि दंगे सुरू झाले. महागाईवरुन जनतेने लक्ष हटवण्यासाठी हे सुरू केलं. महागाईचा प्रश्न विचारला की, हिंदू-मुसलमान, पाकिस्तान-भारत-चीन भारत असे विषय काढले जातात.
वाचा : '...तर पेट्रोल-डिझेलचे दर 50 रुपयांनी कमी होतील' संजय राऊतांनी सांगितला पर्याय
संजय राऊत यांनी पुढे म्हटलं, महाराष्ट्रात दंगली पेटवण्याची सुरवात झालीय. महाराष्ट्रात आग लावायची आणि राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. औरंगाबादचा मोर्चा इशारा आहे, आम्हाला हात लावला तर हात पेटवल्या शिवाय राहणार नाही. कितीही कारस्थान झाले तरी महाराष्ट्रात शिवसेना तुमच्या छताड्यावर पाय देऊन पुढं जाणार आहे.
"समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार" - दिलीप वळसे पाटील
अमरावती बंदला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. अमरावतीत जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाने आज अमरावती बंदची हाक दिली होती. हा बंद शांततेत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने त्यात अप्रिय घटना घडल्या आहेत. मालमत्तेचं नुकसान झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हटलं, विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यंसोबत सुद्धा चर्चा केली आहे. त्यांनाही विनंती केली आहे की, आपलं राज्य महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने शांतता राहील यासाठी सहकार्य करा. अमरावतीत शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करा.
आज राज्यातील सर्व भागांत शांतता आहे. अमरावतीत एक घटना घडली आहे आणि तेथील परिस्थितीत लवकरच नियंत्रणात येईल. समाजात द्वेष निर्माण करणारं किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, BJP, Sanjay raut