मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Amravati: अमरावतीत बंदला हिंसक वळण, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड

Amravati: अमरावतीत बंदला हिंसक वळण, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड

Amravati bandh: अमरावततीत आयोजित करण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे.

अमरावती, 13 नोव्हेंबर : त्रिपुरात (Tripura) घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आज अमरावती बंदची (Amravati bandh) हाक देण्यात आली होती. अमरावती शहर बंदला हिंसक वळण (violence during Amravati bandh) लागल्याचं पहायला मिळालं. जमावाकडून दुकानांवर दगडफेक (stone pelting) आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला गालबोट लागलं होतं. या मोर्चाला हिंसक वळण आलं तर गाड्या व 20 ते 25 दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून आज अमरावती शहर बंदचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले होते. याच बंद दरम्यान आज हिंसाचार झाल्याचं पहायला मिळत आहे.

शुक्रवारी मालेगावात हिंसाचार, 10 पोलिसांसह 2 नागरिक जखमी

त्रिपुरामध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मालेगाव येथे शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. पण, या बंदला हिंसक वळण मिळाले. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये 3 पोलीस अधिकारी, 7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही बंद पुकारण्यात आला होता. या बंदला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला होता.

अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, गृहमंत्र्यांचं राज्यातील जनतेला आवाहन

त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांचे पडसाद राज्यात उमटले. ठिकठिकाणी निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. पण, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पसरवूही नका. गृहमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, राज्याची जनतेनं शांतता व संयम राखावा, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

आज राज्यात ठिकठिकाणी आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

तसंच, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे  कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

First published:

Tags: Amravati