बुलडाणा, 8 जानेवारी : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचं मान्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच खूप उशिर झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी शिंदे गटाचे बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. संजय गायकवाड यांच्या या मागणीनंतर शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.
संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
आता शिंदे गटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागल्याचं पहाय मिळत आहे. काल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं होतं. तर आता आमदार संजय गायकवाड यांनी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा अशी मागणी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार गेल्या 4 महिन्यापासून लांबला आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे.
हेही वाचा : 'साहेब माफ करा महापालिका टक्केवारी'..; बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळील बॅनर चर्चेत
संजय राऊतांवर निशाणा
दरम्यान त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. सरकार फेब्रुवारीचा महिना पाहाणार नाही. आमदारांमध्ये नाराजी आहे. सरकार लवकरच पडेल असं राऊत यांनी म्हटलं होतं. यावर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'हे सरकार 2024 पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण करेल, शिवाय 2024 ते 2029 पर्यंत पुन्हा हे सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये आम्ही असू' असे भाकीत संजय राऊत यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड यांनी वर्तवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sanjay raut, Shiv sena