मुंबई, 10 जुलै : भाजप-शिंदेंच्या सेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा अर्थमंत्रीपद मिळण्याचा अंदाज आहे, तसे स्पष्ट संकेतच राज्य सरकारच्या एका जीआरमधून मिळत आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या उर्जाविभागाचा हा जीआर आहे, ज्यात वित्तमंत्री म्हणून कुणाचेच नाव नाही. सरकारने नेमलेल्या नवीन समितीमध्ये पाच सदस्य आहेत, ज्याचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडवणीस आहेत. पण, सध्या देवेंद्र फडणवीसांकडे अर्थमंत्रीपद असतानाही वित्तमंत्र्याच्या नावापुढे कुणाचेच नाव देण्यात आलेले नाही. देवेंद्र फडणवीसांकडील अर्थ खाते हे पुन्हा एकदा अजित पवार यांना दिलं जाणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतच्या सूत्रांकडून मिळतेय. उद्धव ठाकरे आधी फिरले असते तर? मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले अमोल मिटकरी अजित पवारांना सर्वांना न्याय दिल्याचं सांगत असले, तरी शिंदेंच्या शिवसेनेचा सूर मात्र वेगळा आहे. कारण, शिंदेंच्या बंडासाठी अजित पवारांकडील अर्थखातं प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात आलेलं. आता तेच अजित पवार पुन्हा एकदा अर्थमंत्री होणार असल्यानं, शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे, त्यामुळेच अजित पवारांना अर्थखाते देऊ नये, अशी मागणीच आता शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावरुन शिवसेना आणि अजित पवार गटात जुंपण्याची शक्यता आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेतेही यावर सत्ताधाऱ्यांना चिमटे काढू लागले आहेत. एकंदरीतच, अजित पवारांना पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली आहे पण, असं घडलं, तर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीही उफाळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय तोडगा काढतात? याकडे लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, अजितदादा-शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार? तारीख ठरली!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.