मुंबई, 10 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांचा गट सत्तेमध्ये सहभागी झाला आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत दिली. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली आहे. राष्ट्रवादी आल्यामुळे सहकारी सोडून जाणार? ‘सहकारी सोडून जाणार या सगळ्या अफवा आहेत. घरी बसलेल्यांकडे, फुटलेल्या बोटीमध्ये कोण जाईल? आमदारांनी अडीच वर्षांचं काम पाहिले आहे. अडीच वर्षात एकही सही केली नव्हती. एका वर्षात आमदारांच्या मतदारसंघामध्ये एवढी कामं झाली आहेत. खड्ड्यामध्ये कोण जाईल?’, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे आधी फिरले असते तर? ‘आता उशीर झाला. आता त्यांना फिरणं भाग आहे, नुसतं फिरून उपयोग काय, होतं ते घालवलं. बाळासाहेब सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे, आज किती लोकांवर अडचणी आल्या तेव्हा काय केलं. जेव्हा इगो येतो तेव्हा समोरच्याला कस्पटासमान समजलं जातं, तेव्हा अशा घटना घडतात. पक्षात मोठं मन ठेवावं लागतं, कार्यकर्ते मोठे करावे लागतात. इनसिक्युरिटी ज्याच्याकडे असते तो पक्ष मोठा करू शकत नाही’, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्या वक्तव्याचा विपर्यास ‘गोळी मारून घेईन या वक्तव्याचा विपर्यास झाला असेल. माझ्यासोबत आलेल्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येता कामा नये, याची जबाबदारी माझी होती. एकाचंही नुकसान होऊ देणार नाही. कठीण निवडणुका जिंकल्या तेव्हा सहकाऱ्यांना क्रेडिट दिलं, पण जेव्हा हरलो तेव्हा त्याची जबाबदारी मी घेतली आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले.
हा मोदींचा विजय ‘सगळे विरोधक एकत्र येत आहेत, पण पंतप्रधानपदाचं नाव बाहेर काढलं नाही. सगळे एकत्र येत आहेत, यातच मोदींचा विजय आहे. तुम्ही घाबरलेले आहात. तिकडे बैठका घेतात आणि बाहेर येऊन सांगता की पंतप्रधान मोदीच होणार आहेत’, असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी साधला. फडणवीस आणि तुमच्यामध्ये शीतयुद्ध आहे का? ‘देवेंद्रजी आणि माझ्यात शीतयुद्ध नाही, मतभेद नाहीत. तो चांगल्या मनाचा मोठ्या मनाचा माणूस आहे. मी हार्डकोअर राजकारणी नाही. माझ्याकडेही संवेदना आहेत. मी खूर्चीसाठी तत्त्वांशी विचारांशी तडजोड करणारा माणूस नाही. देवेंद्रजींनी मला मुख्यमंत्री करताना त्यांचं योगदान आहे. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. अजितदादा आले आणखी एक उपमुख्यमंत्री त्यांनी स्वीकारला. काही गोष्टी करायला धाडस लागतं, ते पचवायलाही मोठं मन लागतं, ते त्यांच्यात आहे. आमच्यात दोस्ती आहे, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. हे सगळं झुट आहे, ज्यांना कामधंदा नाही, विरोधक हे सोडत असतात’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. पुढचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? ‘हे जनतेच्या मनात आह. जे काम आम्ही करतोय विकासाचे निर्णय, लोकहिताचे निर्णय आम्हाला कामाला येतील. मोदींच्या नेतृत्वाखाली रेकॉर्डब्रेक जिंकणार, विधानसभा निवडणुका टीम म्हणून लढवणार आणि मेजॉरिटीने जिंकणार. आम्ही काम केलं आहे. उणीदुणी काढणं, शिव्या देणं लोकांना पसंत नाही. आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत. जमिनीवरची माणसं आहोत. लोकांसाठी जेवढं करता येईत तेवढं शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ‘महापालिका निवडणुकांचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. तुम्ही निवडणुका आयोगावरही आरोप करत आहात, सल्ला सुप्रीम कोर्टालाही देत आहात. कितीही खोटं बोललात तरी जनता सुज्ञ आहे. आमच्या कामावर आम्हाला विश्वास त्यामुळे आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार’, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा ‘जेव्हा कतृत्ववान माणूस, काम करणारा माणूस त्याला जेव्हा दाबलं जातं त्याला दुय्यम स्थान दिलं जातं, तेव्हा अशा घटना घडतात. कोणत्याही पक्षप्रमुखाला पक्ष मोठा करायचा असेल, तर कौटुंबिक महत्वाकांक्षा आणि स्वार्थ बाजूला ठेवायचा असतो’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडावरही भाष्य केलं.