कोरोनाच्या आधी ही साथ थांबवा! Whatsapp वरच्या अफवांना थेट डॉक्टरांनी दिलेली उत्तरं...

कोरोनाच्या आधी ही साथ थांबवा! Whatsapp वरच्या अफवांना थेट डॉक्टरांनी दिलेली उत्तरं...

गोमूत्र प्यायल्याने कोरोनाची लागण होत नाही, सॅनिटायझरऐवजी तुरटी वापरणं चांगलं, अंडी आणि चिकनपासून दूरच राहा, कोरोनाची लस आली आहे... अशा पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर वाचल्या असतील. त्या किती खऱ्या? प्रत्यक्ष डॉक्टरांकडूनच घ्या जाणून. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचा लेख खास 1 एप्रिल Fool's day निमित्त

  • Share this:

डॉ.अविनाश भोंडवे (अध्यक्ष,IMA, महाराष्ट्र)

कोरोना साथीच्या संदर्भात गेल्या दोन-अडीच महिन्यात सोशल मिडीयावर येणाऱ्या काही चित्रविचित्र पोस्ट्सवरून हे चांगलेच स्पष्ट होतेय. एकीकडे सर्वसामान्य माणसांना भयभीत करणारे खोडसाळ संदेश, तर दुसरीकडे कोरोनाच्या उपचाराबाबत नसलेली संशोधने, चुकीची माहिती, अशास्त्रीय उपचार सांगून संभ्रमित करणारे मेसेजेस अशी परिस्थिती आहे.

आपणा भारतीयांबाबत तीन गोष्टी युगानुयुगे पक्क्या आहेत. एक म्हणजे आपण अतिशय गतानुगतिक असतो. नव्या गोष्टींना, नव्या ज्ञानाला आपला पक्का विरोध असतो. जुने तेच चांगले असे आपल्याला वाटत असते. औषधे आणि आजारांबाबत तर ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. दुसरा मुद्दा म्हणजे आपण तितकेच अंधश्रद्धाळूही असतो. कुणा थोरामोठ्याने अमुक तमुक तत्व मांडले आहे, असे आपल्याला कुणी सांगितले की त्याची शहानिशा न करता, आपण लगेच त्याचे आचरण करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या जीवाला खूप घाबरतो. विशेषतः आजारांच्या बाबतीत.

अफवा नं. 1 कोरोनावरचं भारतीय औषध

'गोमूत्र गायीचं शेण खाल्ल्याने कोरोना पळून जाईल. तुरटीचा वापर सॅनिटायझर ऐवजी करा.' अशा अर्थाच्या पोस्ट्स तुम्हाला गेल्या महिन्याभरात कित्येक वेळा आल्या असतील. भारतीयांच्या मनात पारंपारिक वैद्यकशास्त्राबद्दल अपरंपार आदर आहे. याचा गैरफायदा घेऊन तथाकथित आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधांच्या आणि उपचारांच्या पोस्ट्स थैमान घालतायत. यात कुणी तुरटीचा वापर सॅनिटायझरच्या ऐवजी करा म्हणतंय, तर कुणी रात्री हळदमिश्रित दूध घेतल्यावर किंवा लसूण खाल्ल्यावर कोरोना होणार नाही म्हणतंय. एका पोस्टमध्ये गोमूत्र आणि गायीचे शेण खाल्ल्याने कोरोना पळून जाईल म्हणून सांगितलं आहे.  त्यावर विश्वास ठेवून आपल्या उत्तर भारतीय बंधुभगिनीनी गोमुत्र पिण्याची शिबिरे घेतली.

FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार? काय सांगतात तज्ज्ञ

हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळीमध्ये दोन मुठी कापूर टाकला तर तुमच्या आजूबाजूच्या सर्व भागातून कोरोना व्हायरस दूर पळून जाईल म्हणूनही एकाने छातीठोकपणे सांगितले. याबरोबर पारंपारिक अग्निहोत्र केले तरी कोरोनाची साथ निघून जाईल असा मंत्रघोषही एका पोस्टमध्ये आढळला. त्यात पुन्हा भर म्हणून मांस खाणाऱ्या लोकांना शाप म्हणून देवाने हा आजार पाठवल्याची शापवाणी उद्गारणारी पोस्ट सध्या सर्वत्र भिरभिरतेय.

अफवा नं.2 चिकन आणि कोरोना

कोंबडी किंवा अंडी खाल्ल्याने कोरोना होतो अशी आवई उठवणाऱ्या पोस्ट्स दोनेक महिन्यांपूर्वी येऊ लागल्या. चीनमधल्या कोरोनाच्या फैलावात हजारो कोंबड्या तिथले लोक मारून टाकतायत असे दाखवणारे व्हिडीओ येऊन थडकले. परिणामतः लोकांनी घाबरून चिकन आणि अंडी खाणे बंद केले. त्यामुळे १५० रुपयांना मिळणारी कोंबडी १० रुपयांना विकली जाऊ लागली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ महाराष्ट्रातल्या कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या उद्योगाला ८०० कोटींपेक्षा जास्त तोटा झाला. पोल्ट्रीचा व्यवसाय जोडधंदा म्हणून करणारे हे छोटे शेतकरी होते.

मुळात कोरोना हा वटवाघळापासून किंवा सापांच्या काही जातीपासून माणसांमध्ये आला असा कयास आहे. पण माणसांमध्ये आल्यावर त्याची उत्क्रांती झाली आणि आजमितीला तो माणसांपासून माणसांनाच होतो. सध्याचा कोरोना व्हायरस प्राण्यांपासून माणसांना अजिबात होत नाही. फक्त बाधित मानवी रुग्णांपासून निरोगी व्यक्तींना होतोय. शिवाय भारतीय कोंबड्यांमध्ये कोरोनाची लागण झालेली नाही असे पशुवैद्याक सडेतोडपणे अनेकदा सांगत आहेत. पण तरीही आज चिकन खायचे म्हटले की आमच्या अंधश्रद्धाळू भारतीयांचा जीव वरखाली होतोय.

या सर्व पोस्ट्स तद्दन खोट्या आणि जनतेला संभ्रमित करणाऱ्या आहेत. अशा संदेशांमुळे लोक शास्त्रीयदृष्ट्या घ्यायची प्रतिबंधात्मक काळजी घेण्यापासून दूर राहतात. आणि या आजारामध्ये जे सर्वात महत्वाचे असते ती गोष्ट म्हणजे त्रास असताना वेळेवर डॉक्टरांना दाखवत नाहीत. साहजिकच त्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते आणि कोरोनाची साथ वेगाने फैलावते.

अफवा नं. 3 कोरोनाविषयीची संशोधनं

कोरोना विषाणूच्या आजारापासून बरे करणारे औषध अमुक चिनी संशोधकाने शोधून काढले आहे. एका भारतीय कंपनीने कोरोनाची लस शोधून काढली आहे.

डास चावल्याने कोरोना होतो? या 7 गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका

अमुक औषधाने तमुक देशातील इतक्या लोकांना झालेला करोना बरा झाला. अमुक शहरात कोरोनाचा अतिशय गंभीर स्वरूपाचा त्रास होणाऱ्या रुग्णाला अॅण्टिव्हायरल औषधे देऊन वाचवले. अशा पोस्ट्स या COVID-19 च्या साथीमुळे भयभीत झालेल्या लोकांना अकारण खोटा आशेचा किरण दाखवतात. या दरम्यान अशा पोस्ट्सचा फायदा घेऊन कोरोनाची लस टोचण्याचे शिबीर चालवणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी जेरबंद केल्याची खबरही उयेऊन गेली.

तथ्य काय?

लक्षात घ्यायला पाहिजे, की कोरोना हा विषाणू जगाला 31 डिसेंबर 2019 रोजी ज्ञात झाला. केवळ दोन अडीच महिन्यात त्यावर संशोधन होऊन लस किंवा औषध शोधले जाणे केवळ दुरापास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर केंव्हाच सांगितलेय की अजून एक वर्षभर तरी कोरोनावर लस किंवा औषध निघणे शक्य नाही. साहजिकच अशा खोट्या औषधांच्या आणि लसींच्या भुलभुलैय्याच्या आहारी जाण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

'10 सेकंद श्वास रोखलात तर तुम्हाला कोरोना नाही', सेल्फ टेस्टबाबत Fact Check

महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे की अशा अशास्त्रीय किंवा संभ्रमित करणाऱ्या पोस्ट्स जर सोशल मिडीयावर आढळल्या तर त्या तयार करणाऱ्या व्यक्तीला सायबर क्राईमच्या गुन्ह्यांतर्गत कडक शिक्षा होईल. असेच आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्यानेही केले आहे.     म्हणून लक्षात ठेवा, अशा खोट्या पोस्ट्सवर विश्वास ठेवू नका, त्या अविचारीपणे फॉरवर्ड तर मुळीच करू नका. शक्य असल्यास त्यांची माहिती पोलिसांना देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी ही व्हायरल होणाऱ्या खोट्या संदेशांची साथ आवरली गेली पाहिजे.

(लेखक पुण्यातले वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टर असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या IMA महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आहेत.)

अन्य बातम्या

Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो?

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त, UNICEF ने सांगितलं घरात बसून काय करायचं

First published: April 1, 2020, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading