मुंबई, 5 नोव्हेंबर: दिवाळीच्या (Diwali) काळात मुंबईत (Mumbai) सार्वजनिक ठिकाणी, समुद्रकिनाऱ्यांवर फटाके (fire cracker) फोडण्याची परंपरा आहे. मात्र, याबाबत मुंबई महापालिका (BMC)लवकरच मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे यावर यंदा निर्बंध घालण्यात येणार असल्याचा विचार सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
हेही वाचा...'यशोमती ठाकूर यांना मंत्रिपदावरून काढल्यास उद्धव ठाकरेंना सरकार पडण्याची भीती'
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा सार्वजनिक ठिकाणांवर, रस्त्यांवर फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्याचा मुंबई महापालिकेचा विचार करत आहे. दिवाळीच्या बाबतीतली मार्गदर्शक तत्वे येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचंही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'News18 लोकमत'शी बोलताना माहिती दिली.
सॅनिटायझरमुळे आगीचा धोका..
दरम्यान, या वर्षीची दिवाळी साजरी करताना मोठ्या आवाजाचे, मोठ्या आकाराचे, आकाशात उडणारे फटाके फोडू नका. सोबतच फटाके फोडताना सॅनिटायझर जवळ बाळगू नका. हाताला सॅनिटायझर लावू नका. अन्यथा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे आवाहन मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या वतीने मुख्य अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी केला आहे
दुसरीकडे, सध्या कोविड-19 चा काळ असल्यानं प्रदुषणात भर पडून लोकांना त्रास होवू नये, यामुळे फटाके विक्री आणि फोडण्यावर बंदी आणावी, अशी मागणी मुंबईसह राज्यभरात जोर धरु लागली आहे.
अंनिसनं केली मागणी...
फटाक्यांवर बंदी घालावी यासाठी महाराष्ट्र अंनिस गेले अनेक वर्षे प्रबोधन करत आहेत. यंदा कोरोनाच्या काळामध्ये प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसनं केली आहे. रुग्णांमध्ये श्वसनाचे विकार बळावत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचाच आधार घेत महाराष्ट्रातही फटाक्यांवर ती बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा...मुंबईजवळील समुद्रात बोट बुडाली, 2 तास पोहून 6 जणांनी वाचवला स्वत:चा जीव
राष्ट्रीय एकात्मतेचा दिवाळी सण फटाक्यांशिवाय अशक्यच..
ऐन दिवाळीच्या तोंडावर राजस्थान सरकारने फटाक्यांवर केलेली बंदी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी कोरोना आणि आणि फुफुसच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात देखील फटाका बंदीची मागणी केलीय. मात्र, दिवाळी हा राष्ट्रीय एकात्मतेचा सण आहे हिंदू,मुस्लिम,शीख,ख्रिश्चन सर्व धर्मीय फटाके फोडून हा सण साजरा करतात त्यामुळे फटाक्यांशिवाय ते अशक्य असल्याचं मत व्यक्त करत जालनेकरांनी फटका बंदीच्या मागणीला तीव्र शब्दात विरोध केला.