मुंबई, 5 सप्टेंबर : “ज्यावेळेला आपल्या शिवसेनेत गद्दारी केली. होय गद्दारच म्हणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिपकलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुस्ता येणार नाही”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर बाण मारला. उद्धव ठाकरे आजच्या दसरा मेळाव्यात प्रचंड भावनिक झालेले बघायला मिळाले. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, बघिनी आणि मातांनो, विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झालेला आहे. अभूतपूर्व! मनापासून सांगतो, मी भारावून गेलो आहे. भाषणासाठी खूप मुद्दे आहेत. पण मी खरंच किती बोलू शकेन. कारण तुमचं हे प्रेम पाहिल्यानंतर मुद्दे असले तरी शब्द सूचत नाही. हे विकत मिळत नाही. ओरबाडून घेता येत नाही. माझ्या शिवसैनिकांची गर्दी आहे. याच शिवतीर्थावर मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तुमच्यासमोर नतमस्तक झालो होतो. आजसुद्धा डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही. पण तुमच्यासमोर नतमस्तक केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कारण हेच आशीर्वाद आहेत. आई जगदंबेचे जीवंत कवच आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“त्यांनी गद्दारी केली त्यावेळेला अनेकांना प्रश्न पडला होता की, अरे बापरे आता पुढे काय? पण माझ्या मनात चिंता नव्हती. कारण ज्यांनी हे कार्य सोपवलं आहे तो बघून घेईल. आज शिवतीर्थ बघून पुन्हा त्यांना प्रश्न पडला, अरे बापरे गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाडे देऊन आलेला नाही. वृद्ध, दिव्यांग लोकं आले आहेत. गावावरुन पायी चालत लोकं आहेत. तिथे एक आहे, पण इथे एकनिष्ठ आहेत. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. पण यावेळेचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता कितीचा झाला? आता ५० खोक्यांचा खोकासूर आहे. वाईट एका गोष्टीचा वाटतो आणि संतापही एका गोष्टीचा येतो की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये होतो, मी बोललो नाही तुमच्याशी, माझे बोटंही हलत नव्हते, शरीर पूर्ण पडलं होतं. ते कटप्पा, हो कटप्पा म्हणजे कट करणारे अपत्य म्हणजे कटप्पा हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही, आपल्यासमोर येऊच शकणार नाही. पण त्यांना कुणाला कल्पना नाही की हा फक्त उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. ही शक्ती माझ्या आई जंगदंबेने दिली आहे. त्या शक्तीशी तुम्ही पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. पण तेजाचा एक शाप असतो तो तेजाचा शाप आहे”, असं उद्धव म्हणाले. उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले? मोदी सरकार 2014 साली आलं होतं तेव्हा रुपयांचा, डॉलरचा भाव किती होता? आज किती झाला? त्यावेळेला भाजप नेत्या सुषमा स्वराज संसदेत भाषण करत होत्या की, मला टीव्ही लावायला भीती वाटते की रुपयाचा भाव आणखी किती खाली येणार आहे? आताही तेच होतंय. पण तेव्हा काय भाव होता आणि आता 80 रुपयांच्या पुढे डॉलरचा भाव गेला आहे. सुषमा स्वराज त्यावेळी म्हणाल्या होत्या, ज्या देशाचं चलन घसरतं तेव्हा रुपया नाही घसरत तर देशाची पद सुद्धा घसरते. माझ्या देशाची पद घसरते. आपले देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देशाचे मंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत? हेच कळत नाही. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड, इकडे फोडाफोडी कर, तिकडे फोडाफोडी कर, मध्येच मुंईत येणार शिवसेनेला जमीन दाखवा. बघाना आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत. आम्ही त्यांना आज आव्हान देतोय, आम्हाला जमीन बघायचीच आहे. अमित शाहाजी आम्हाला जमीन दाखवा. पण ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन पुन्हा जिंकून दाखवा. ती जमीन आमचीच आहे. आमची मातृभूमी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही जागा तुम्ही परत घेऊ शकलेला नाहीत. चीन अरुणाचल, लडाखमध्ये घुसलं आहे. जा ना ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. हे कशाला पाहिजे हे गद्दार? आम्ही तुम्हाला घेऊन नाचू, मागे नाचत होतो तसे.
राज्यभरात आज दसऱ्याचा उत्साह आहे. या उत्साहादरम्यान महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत विचारांचं सोनं लुटण्यासाठी हजारो नागरिकांचा जनसमुदायल लोटला. मुंबईत आज शिवसेनेचे दोन मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानावरील भव्य दसरा मेळावा, तर दुसरा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील दसरा मेळावा. दोन्ही मेळाव्यांकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. या मेळाव्यात कोण काय भूमिका मांडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अगोदरपासूनच प्रचंड जय्यत तयारी करण्यात आलेली होती. त्यामुळे शिंदेंच्या मेळाव्याला लाखो नागरिकांनी हजेरी लावली. त्या तुलनेने ठाकरे गटाच्या मेळाव्यात कमी गर्दी बघायला मिळतेय. पण दोन्ही मेळाव्यात अफाट गर्दी बघायला मिळतेय.