कल्याण, 23 एप्रिल: कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात गेल्या 6 दिवसांत 48 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी आणखी 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील डोंबिवलीमधील 4, कल्याणमधील 6 तर टिटवाळामधील एकाचा समावेश आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 108 वर पोहोचली आहे. त्यातील 33 जणांना घरी सोडले आहे तर महापालिका क्षेत्रात डोंबिवलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कल्याणच्या तुलनेत जास्त आहे.
हेही वाचा.. लॉकडाऊनंतर कधीपासून सुरू होणार रेल्वे? जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लॅनकल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-19 तपासणीसाठी स्वतंत्र लॅब होणार
दुसरीकडे, कोरोना अर्थात कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. कोरोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीसाठी स्वतंत्र तपासणी लॅब असावी, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी कोरोना तपासणीची स्वतंत्र लॅब उभारण्यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून इथे स्थानिक पातळीवर लॅब असणे आवश्यक आहे. सध्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात पाठवावे लागते. त्याचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येत आहेत.
हेही वाचा.. कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी, मुंबईकरांनी करुन दाखवलं!
त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना तपासणीची स्वतंत्र लॅब असावी, यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील होते. अशा प्रकारच्या लॅबसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन योजनेतून देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. ही मागणी राजेश नार्वेकर यांनी मान्य केली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आता सदर लॅबचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.