पुणे, 27 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून त्यांनी रोज जवळपास १६ तास कामाचा धडाका लावला आहे. पुणे दौऱ्यावर असताना चार दिवसांत त्यांनी जवळपास ४८ पेक्षा जास्त बैठका घेतल्यात. मात्र, कुठल्याही राजकीय विषयावर त्यांनी नव्याने वाद उभा राहील अशी कुठलीही भूमिका मांडायची नाही आणि घ्यायची ही नाही असा चंगच बांधलाय दिसतोय.
राज्याच्या राजकारणात प्रचंड वजन असलेल्या अजित पवारांना राजकीय स्थैर्य आणि सामाजिक महत्त्व फारस मिळत नाही आणि ते मिळवण्यासाठी त्यांच्या आक्रमक भूमिका अनेकदा त्यांना अडचणीत आणत गेल्यात आणि पर्यायाने त्यांच राजकीय वजन ही सतत बिघडत राहिलंय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेऊन सरकारमध्ये गेल्यामुळे पक्षात आणि बाहेरही त्यांचाविरोधात बरीच टीका झाली. विचारधारेचा क्षणभर ही विचार न करता बेधडक भाजपसोबत केलेली युती त्यांच्या प्रतिमेला तडा देऊन गेली. या सगळ्यातून पोळलेले अजित पवार आता कुठलाही गोंधळ नको म्हणून ताक ही फुंकून पित आहेत.
अजित पवार यांनी राजकीय कोलांट्या उड्या मारूनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा मोठा गट त्यांच्या पाठीशी भक्कम पाठिंबा देऊन उभा होता. त्यामुळे शरद पवार यांच्या समोर त्यांना उपमुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण, ही प्रक्रिया अजित पवार यांच्यासाठी ही प्रचंड त्रासिक ठरली.
अचानक महाविकास आघाडीत ही त्यांनी पुन्हा उपमुखमंत्रिपदाची शपथ घेतली पण आधीच्या भाजपसोबत जाण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे आता थेट टीका करणे किंवा वाद उपस्थित करण्यापेक्षा प्रचंड काम करणारा नेता ही इमेज आणखी उजळ करण्याचा त्यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक आणि जोरदार सुरू आहे. ते तसं ते वारंवार बोलून ही दाखवतात.
सरकारमध्ये होणारे वाद किंवा निर्णय प्रक्रियेवर होणारे मतभेद यांवर कुठल्याही भूमिका अजित पवार हे गेल्या महिनाभरात बोलत नाही. कुणाच्याही कुठल्याच वादावर मी बोलणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय आणि त्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष देतोय ती हौस मला जास्त आहे, असं ही ते सांगायला विसरत नाहीत.
हा काय बोलला तो काय बोलला याच्यावर मी काही बोलणार नाही. तुम्ही ते त्यांनाच विचारा, मला यात पडायचं नाही मला काम करायची हौस आहे, ते मी करतो, असं अजित पवार यांनी आपल्या शैलीत सांगितलं.
अजित पवार हे कामाचा प्रचंड आणि निर्णायक असलेले नेते म्हणून ओळखले जातात. पण, जेव्हा धूर्त राजकारण करण्याची वेळ येते तेव्हा ते सतत अडचणीत येतात. त्यामुळे परफॉरेमन्सची जमेची बाजूच आपल्याला राजकारणात तारू शकेल हे त्यांनी पुरत ओळखलेलं आहे आणि त्यादृष्टीनेच त्यांनी इमेज मेकओव्हर सुरू केल्याचं पहायला मिळतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Congress, NCP, Sharad pawar, Shivsena