Home /News /maharashtra /

दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, अजित पवारांनी दिली मोठी माहिती, म्हणाले...

दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, अजित पवारांनी दिली मोठी माहिती, म्हणाले...

पुण्यात डिसेंबर, जानेवारीत दुसरी लाट येऊ शकते, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी जबाबदारीनं वागा

पुणे, 16 ऑक्टोबर: 'माझं कुटुंबं, माझी जबाबदारी' या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून 'पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार', या अभियानाला पुणेकरांनी साथ द्यावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आवाहन केलं. अजित पवारांच्या हस्ते पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आलं. दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, दिवाळीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येईल, दिवाळीआधी शाळा सुरू होणार नसल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा..कोरोना लशीचं ट्रायलं थांबणं ही चांगली बाब; तज्ज्ञ असं का म्हणतायेत? अजित पवार यांनी सांगितलं की, आपण कोरोना महामारीच्या संकटातून आपण जात आहोत. मध्यतंरी सोशल डिस्टंसिंगकडे दुर्लक्ष झालं. त्याचा परिणाम पुणेकरांनी भोगला आहे. सुरुवातीला लोकं कोरोना झाल्याचं सांगायला घाबरायचे, आता मात्र, परिस्थिती बदलत आहे. पुण्यात डिसेंबर, जानेवारीत दुसरी लाट येऊ शकते, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी जबाबदारीनं वागा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. 'बाबांनो कोरोनाला लाईटली घेऊ नका' पुणेकरांनो, नो मास्क दंडांच्या माध्यमातून 12.5 कोटी जमा झाले आहेत. हे बरं नाही. बरेच जण हनुवटीच्या खाली मास्क लावतात. 'बाबांनो कोरोनाला लाईटली घेऊ नका', असंही पुणेकरांना अजित पवारांनी फटकारलं. अजित पवार यांनी सांगितलं की, मध्यंतरी काही लोकांनी गरज नसताना औषधं घेऊन ठेवली. काहीनी काहीच काळजी घेतली नाही. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. सरकार आणि प्रशासन चांगलं काम करत आहे. मात्र, नागरिकांकडून सरकारला सहकार्य अपेक्षीत आहे. कोरोनामुळे यंदा आपल्याला पंढरीची वारी रद्द करावी लागली. गणेशोत्सवावरही बंधनं आणावी लागली. आता नवरात्र आलं दसरा दिवाळीही येईल. हे सण साधेपणाने आणि गर्दी टाळून साजरे करा, असं अजित पवार यांनी सांगितलं. पीएमपीला अजूनही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. पण ठिक हे लोकांनाही विनाकारण बाहेर पडू नये. प्रवाशांनी काळजी घ्यावी. अनलॉक पॉलिसीनुसार राज्याचं अर्थचक्र रूळावर येत आहे. राज्यातलं पहिलं कोरोनामुक्त शहर होण्याचा बहुमान पुणेकरांनी मिळवावा, अशी अपेक्षा अजित पवार यांनी पुणेकरांकडून व्यक्त केली आहे. पुणेकरांसाठी अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे थेट आदेश कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 'कोविड-19' विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली. 'जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि, ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यायत यावी' असे आदेश अजित पवारांनी दिले. तसंच, 'केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवावा' असे निर्देशही अजित पवारांनी दिले. हेही वाचा...जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर अजितदादांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले... 'मृत्यदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाकाळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनानी सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ajit pawar, Maharashtra, Pune, Pune ajit pawar

पुढील बातम्या