वॉशिंग्टन, 16 ऑक्टोबर : नुकतंच अमेरिकेत एका कोरोना लशीचं (corona vaccine) आणि कोरोनावरील अँटिबॉडी औषधाचं ट्रायल थांबवण्यात आलं आहे. याधीदेखील संपूर्ण जगाचे डोळे लागून असलेल्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचं ट्रायलही तात्पुरतं थांबवलं होतं. कोरोनाविरोधात प्रभावी उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांसाठी हा तसा मोठा धक्का आहे. मात्र तरीदेखील असं ट्रायल थांबवणं हे खरंतर चांगलं आहे, असं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सनची लस आणि इल लिली कंपनीचं कोविड-19 वरील औषध यांच्या पुढच्या टप्प्यांतील चाचण्या तूर्तास थांबवण्याचा निर्णय या आठवड्यात घेण्यात आला आहे. शिवाय महिनाभरापूर्वी ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनका कंपनीने तयार केलेल्या कोरोना लशीच्या चाचण्याही थांबवल्या होत्या. इतर देशांमध्ये या चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अमेरिकेत अद्यापही नाही. क्लिनिकल ट्रायल्स विषयातील तज्ज्ञांच्या मते जरी या चाचण्या थांबवल्या असल्या तरीही जगभरातील लोकांच्या दृष्टिने ही हिताचीच गोष्ट आहे.
या चाचण्या थांबवल्या आहेत याचाच अर्थ या कंपन्या क्लिनिकल ट्रायलच्या सांगितलेल्या सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित पाळत आहेत. दुसरं म्हणजे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये काही जणांना लस तर काहींना जणांना प्लासिबो दिलं जातं. कुणाला काय दिलं आहे, हे ना त्या व्यक्तीला माहिती असतं ना त्या डॉक्टरला. त्यानंतरच्या आठवडाभर त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जातं. त्यांचं दरमहा चेक अप होतं आणि त्यांना जाणवलेल्या लक्षणांची नोंद जर्नलमध्ये केली जाते. ज्यांना औषध दिलं जातं ते रुग्णालयात असताना त्यांच्या रक्ताच्या तपासण्या आणि वैद्यकीय चाचण्या होतात.
जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर ऑफ गॉटिंगनमधील बायोस्टॅटिस्टिशियन टीम फ्रीडे हे औषधांच्या चाचण्यांमध्ये सेफ्टी मॉनिटर म्हणून काम करतात. ते म्हणाले, "मी अशा 50 ट्रायल मॉनिटर केल्या आहेत पण असं एकदम चाचण्या थांबवण खूपच दुर्मिळ आहे"
हे वाचा - कोरोना लशीत रशियाने मारली बाजी! 2 महिन्यांत 2 लशींना परवानगी, तिसरी लसही तयार
शरीरावर ओरखडे उठणं किंवा डोकेदुखीसारख्या किरकोळ परिणामांमुळे ट्रायल थांबवली जात नाही पण जेव्हा विपरित परिणाम होत असल्याचं लक्षात येतं तेव्हा तपासणीतज्ज्ञ प्रायोजक कंपनीला ती माहिती देतात. त्यानंतर प्रायोजक कंपनीनी ती माहिती अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए), डाटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाला देणं अपेक्षित असतं. मॉनिटरिंग बोर्ड सर्व स्वयंसेवकांच्या चाचण्यांची सर्व माहिती मागवून तपासणी करू शकतो. या विपरित परिणामाशी त्या ट्रिटमेंटचा संबंध आहे का हे तपासतं. अगदी क्वचित प्रसंगी गुलियान बार सिंड्रोम हा आजार ट्रायलचा परिणाम म्हणून होऊ शकतो.
जर या बोर्डाला आणि कंपनीला ट्रायलचा विपरित परिणाम चिंताजनक वाटला तर ते हा परिणाम लस किंवा औषध घेतलेल्या की प्लासिबो घेतलेल्या लोकांवर झाला याची माहिती न घेताही ट्रायल थांबवू शकतात. विपरित परिणाम झाला आहे तो लशीचा किंवा ट्रिटमेंटचा परिणाम असण्याची खूप कमी शक्यता आहे असं जर बोर्डाचं म्हणणं असेल तर ट्रायल सुरू होऊ शकते. पुरावे जर स्पष्ट नसतील तर बोर्ड अधिक चाचण्या करण्याची सूचना करून ट्रायल सुरू ठेवायला सांगू शकतात.
हे वाचा - Coronavirus विरुद्धच्या लढाईचं झालं होतं कौतुक, पण आता कुठे फसला 'केरळ पॅटर्न'?
पण आता ट्रायल थांबवलेल्या दोन लशी आणि एका औषधाचा उपयोग जगातील अब्जावधी निरोगी लोक करणार आहेत त्यामुळे ट्रायलमधील एका व्यक्तीवर जरी विपरित परिणाम झाला तर सगळं तपासून पाहणं गरजेचं आहे.
एफडीएच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियातील प्राध्यापक डॉ. पॉल ऑफिट म्हणाले, "ट्रायल थांबवणं हे सर्वच दृष्टिने मोठं आव्हान आहे. 10 देशांत 60 हजार स्वयंसेवकांवर प्रयोग करणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनसारख्या कंपनीच्या दृष्टिने तर ते अधिकच कठीण आहे. एखादी मोठी युद्धनौका अचानकच थांबवण्यासारखं आहे"
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापक आणि लसतज्ज्ञ डॉ. स्टॅन्ली प्लोटकिन म्हणाले, "जगात 43 लशींवर प्रयोग सुरू आहेत. त्यापैकी दोन लशींचं ट्रायल थांबणं हे काही आश्चर्यजनक नाही. आता अधिक काळजीपूर्वक ट्रायल घेतल्या जातील"