नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: मंगळवारी (28 सप्टेंबर) उत्तर कोरियाने आपल्या नव्या हायपरसॉनिक मिसाइलची चाचणी (North Korea Hypersonic missile test) केली. या महिन्यातली ही तिसरी मिसाइल चाचणी होती. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांचा गेल्या काही महिन्यांमध्ये दिलेल्या भाषणांमधील सूर पाहता हे स्पष्ट होतंय, की त्यांना आण्विक शस्त्रांच्या बाबतीत अमेरिकेशी स्पर्धा करायची आहे. या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीमुळे आता उत्तर कोरियाही चीन, रशिया आणि अमेरिकेच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. या पार्श्वभूमीवर, हायपरसॉनिक मिसाइल म्हणजे काय आणि त्यांची क्षमता काय आहे, हे जाणून घेऊ या. 'फर्स्ट पोस्ट'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगवान
हायपरसॉनिक मिसाइलचा यूएसपी (USP of Hypersonic missile) आहे त्यांचा वेग आणि हाताळण्याची क्षमता. अगदी सामान्य हायपरसॉनिक मिसाइलही ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेगाने (Speed of Hypersonic missile) जाऊ शकतं. आवाजाचा वेग साधारणपणे 761 मैल प्रतितास असतो. हायपरसॉनिक मिसाइल त्याच्या कितीतरी पट अधिक वेगाने (3,836 mph) प्रवास करतं. एवढंच नाही, तर प्रचंड वेगासोबतच हे मिसाइल अतिशय उत्तमरीत्या हाताळताही (Manoeuvrable) येतं. या मिसाइलची दिशा ठरवणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळेच हे मिसाइल अडवणं शत्रूला सोपं जात नाही. म्हणजेच, हायपरसॉनिक मिसाइलमध्ये एका बॅलिस्टिक मिसाइलचा वेग आणि क्रूज मिसाइलची हाताळण्याची क्षमता यांचं मिश्रण असते, असं म्हणण्यास हरकत नाही.
अर्थात, हायपरसॉनिक मिसाइल्सपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या मिसाइलही उपलब्ध आहेत. अगदी रशिया सध्या तयार करत असलेलं Kh-47M2 Kinzhal हे हवेतून मारा करणारं बॅलिस्टिक मिसाइल तर चक्क 7,672 मैल प्रतितास या वेगाने मारा करतं. तसंच, याची रेंजही 1,200 मैल एवढी मोठी आहे.
6 मिनिटांत भेदू शकते लक्ष्य
हायपरसॉनिक मिसाइलचेही दोन प्रकार (Types of Hypersonic missiles) असतात. हायपरसॉनिक क्रूज मिसाइल आणि हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल्स. क्रूज मिसाइल्स एक लाख फूट उंचीपर्यंतच जाऊ शकतात, तर ग्लाइड व्हेइकल्स (Hypersonic glide vehicles) त्याहूनही उंच जाऊ शकतात. ग्लाइड व्हेइकल्स रॉकेटवर ठेवण्यात येतात. त्यानंतर रॉकेटच्या साह्याने त्या लाँच केल्या जातात.
या पृथ्वीच्या वातावरणाच्याही वर उडू शकतात. ज्येष्ठ इंजिनिअर आणि रँड रिसर्चर रिच मूरे यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत या मिसाइलबाबत अधिक माहिती दिली आहे. ते सांगतात, “हायपरसॉनिक क्रूज मिसाइल आपल्या लक्ष्यावर अचूक निशाणा बसण्यासाठी स्क्रॅमजेट (SCRAMJET) या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन लाँच केली जातात. या मिसाइल्सचा वेग प्रचंड असतो. लाँच केल्यानंतर ती केवळ सहा मिनिटांमध्ये आपलं लक्ष्य भेदू शकतात.”
अभेद्य अस्त्र
आपल्या ताफ्यामध्ये हायपरसॉनिक मिसाइल असल्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, या मिसाइल्सना अडवण्याची एखादी ऑपरेशनल किंवा विश्वसनीय अशी पद्धत (Intercepting Hypersonic Missile) सध्या कोणाकडेच उपलब्ध नाही. ही मिसाइल्स एक तर प्रचंड वेगात येतात. त्यातच त्यांना कशीही दिशा देणं शक्य आहे. त्यामुळे ती कधी कोणत्या दिशेला वळतील याचा अंदाज बांधणं केवळ अशक्य आहे. म्हणूनच या मिसाइल्सना अडवणं सध्या तरी अशक्यप्राय गोष्ट असल्याचं मत रँडचे ज्येष्ठ इंजिनीअर जॉर्ज नकौझी यांनी व्यक्त केलं. सबसॉनिक आणि सुपरसॉनिक शस्त्रांपेक्षा वेगवान आणि कशाही डिफेन्स सिस्टीमला भेदू शकणारी अशी ही मिसाइल्स कोणत्याही देशाच्या लष्कराला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
यामुळेच अमेरिका हायपरसॉनिक मिसाइल्सच्या निर्मितीसाठी लाखो डॉलर्स खर्च करत आहे. ‘हायपरसॉनिक कन्व्हेन्शनल स्ट्राइक वेपन’ (Hypersonic Conventional Strike Weapon) या मिसाइलच्या निर्मितीसाठी सुमारे 928 मिलियन डॉलर्सचा करार करण्यात आला आहे. AGM-183A या हवेतून लाँच होणाऱ्या रॅपिड रिस्पॉन्स वेपनसाठी 480 मिलियन डॉलर्सचा करार करण्यात आला आहे. पार्टयार्ड मिलिट्री डॉट कॉम या वेबसाइटच्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे चीनही मोठ्या प्रमाणात हायपरसॉनिक शस्त्रं तयार करत आहे. चीनने यापूर्वीच आपलं ‘लिंग युन’ (Ling Yun) हे स्क्रॅमजेट प्रणालीवर चालणारं मिसाइल प्रदर्शित केलं आहे. तसंच, DF-17 या बॅलिस्टिक मिसाइल लाँच्ड हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकलचीही चाचणी ते लवकरच घेणार आहेत.
कुणाकुणाकडे आहे हे क्षेपणास्त्र
हायपरसॉनिक मिसाइल्स असणारा चौथा देश म्हणजे रशिया. रशियानेही या वर्षीच्या जुलैमध्येच आपल्या झिक्रॉन (Zicron) हायपरसॉनिक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी घेतली. ‘व्हाईट सी’मध्ये असणाऱ्या अॅडमिरल गोर्शकोव्ह (Admiral Gorshkov) या युद्धनौकेमधून हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले होते. तिथून सुमारे 350 किलोमीटर दूर, बार्नेट्स समुद्राच्या किनाऱ्यावर असणारं लक्ष्य या मिसाइलने अचूकपणे भेदलं होतं. देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या मिसाइलचा वेग साधारणपणे ध्वनीच्या वेगाच्या नऊ पट असल्याचं सांगितलं आहे. तसंच, याची रेंज सुमारे 1,000 किलोमीटर असल्याचंही ते म्हणाले. या देशांव्यतिरिक्त युनायटेड किंगडम आणि फ्रान्सदेखील संयुक्तपणे ‘पर्सिअस’ (Perseus) या हायपरसॉनिक मिसाइलची निर्मिती करत आहेत. 2011 सालापासून ते याबाबत संशोधन करत आहेत. यूके आपल्या हार्पून आणि फ्रान्स आपल्या एक्झोसेट या मिसाइल्सना पर्याय म्हणून पर्सिअसकडे पाहत आहेत.
जगभरातल्या महासत्ता शस्त्रास्त्रांचे नवनवीन प्रकार तयार करताना, या सगळ्यामध्ये भारतदेखील मागे नाही. 2020मध्ये भारताने आपल्या पहिल्या हायपरसॉनिक मिसाइल डेमॉन्स्ट्रेटरची यशस्वी चाचणी घेतली होती. देशाच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) हे संपूर्ण भारतीय बनावटीचं हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकल (HSTDV) तयार केलं होतं; मात्र सध्या तरी हायपरसॉनिक मिसाइलची यशस्वी चाचणी घेऊन उत्तर कोरियाने आपण कित्येक देशांच्या तुलनेत पुढे असल्याचं सिद्ध केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Missile, North korea