मुंबई, 17 जुलै : मुंबईत (Mumbai Rain) शुक्रवारी (16 जुलै 2021) सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 253.3 मिमी पावसाची (Rain) नोंद झाली. गेल्या 12 वर्षात शहरात जुलै महिन्यात एकाच दिवसात सलग तिसऱ्यांदा एवढ्या प्रमाणात पाऊस पडल्याचे आयएमडीच्या (IMD) डेटावरुन दिसून येते. गेल्या 24 तासांत पडलेल्या या पावसाची नोंद मुंबईत भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रुझ वेधशाळेत (Santacruz Observatory) झाली आहे. या पूर्वी 15 जुलै 2009 मध्ये मुंबईत 274.1 मिमी पावसाची नोंद झाली होती तर 2 जुलै 2019मध्ये उच्चांकी 376.2 मिमी पावसाची नोंद झाल्याचे आयएमडीच्या नोंदीवरुन दिसून येते.
शुक्रवारी सकाळपर्यंत पडलेला पाऊस हा प्रामुख्याने पश्चिम उपनगरं आणि मध्य मुंबईच्या काही भागांत बरसला. या दिवशीच्या पावसाच्या नोंदी पाहता पूर्वेकडून जोरदार वारे वाहिल्याने ढग दक्षिण मुंबईपासून दूर लोटले गेले. त्यामुळे स्थानिक पर्जन्य वितरणात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आल्याचे तज्ज्ञांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना सांगितले. त्यामुळे कुलाबा वेधशाळेत (Colaba Observatory) शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत केवळ 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, दोन्ही वेधशाळांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.
कोकणातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, काय असेल मुंबई-पुण्याची स्थिती?
हे का घडतंय याबाबत आत्ताच खात्रीशीर सांगता येणार नाही. गुरुवारी उशिरापर्यंत आलेली रडार छायाचित्रं (Satellite Images) पाहता विजांच्या कडकडाटसह पाऊस पडण्याचा कोणताही अंदाज दिसत नव्हता. मुंबईवर पश्चिमेकडून येणारे खालच्या थरातील वारे, मान्सून वाऱ्यांमुळे मध्य किंवा पूर्व भारतात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा (Low pressure Area) किंवा किनारपट्टीला समांतर अशी द्रोणीय स्थिती (Offshore) असे ठराविक संकेत नसल्याने हवामानाच्या मॉडेल्सला देखील याबाबत अंदाज बांधता आला नसल्याचे निरीक्षण हवामानशास्त्रज्ञ आणि पीएडीचे विद्यार्थी अक्षय देवरस यांनी नोंदवले.
या विकेंन्डला चुकूनही लोणावळ्याला जाण्याचा प्लान करु नका, नाहीतर पडेल भारी
सांताक्रूझ वेधशाळेने 1 जूनपासून 1544.9 मिमी पावसाची नोंद केली असून 609.1 मिमी पाऊस अधिक झाल्याचे म्हटलं आहे. कुलाबा हवामान विभागाने 132.68 मिमी पावसाची नोंद केली असून, 1 जूनपासून आतापर्यंत 1068.4 मिमी पाऊस नोंदला गेला आहे.
यावेळी पावसाळा असामान्य का आहे?
अक्षय देवरस म्हणाले, की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र नसतानाही शुक्रवारी मुंबईत झालेला पाऊस म्हणजे या शतकातील पहिलीच दुर्मिळ घटना मानावी लागेल. मुंबईच्या उपनगरातील डोंगराळ भागात विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि परिसरात त्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली. अशा प्रकारची स्थिती प्रामुख्याने जून महिन्याच्या सुरुवातीला असते. जुलै महिन्यात कमी दाबाचा पट्टा किंवा किनारपट्टी लगत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने जोरदार पाऊस पडतो. मात्र जुलै महिन्यात अशी वादळी पावसाची (Thunderstorm) स्थिती पाहायला मिळत नाही.
मुंबईत जुलै महिन्यातील पावसाची सरासरी 1332.5 मिमी असते. त्यातुलनेत आतापर्यंत 1545 मिमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार 1 जून ते 16 जुलै दरम्यानचा सामान्य पाऊस 935.8 मिमी आहे. मात्र 16 जुलैपर्यंत मुंबईत सामान्य पावसाच्या तुलनेत 65 टक्के पाऊस अधिक झाला आहे.
पुढील आठवड्याचा हवामान अंदाज
पुढील आठवड्यात किंवा या महिन्यातील उर्वरित दिवसांदरम्यान पावसाची स्थिती काय असेल हे अस्पष्ट असल्याचं हवामान विभागाने सांगितले. जुलैमध्ये पडणाऱ्या तीव्र पावसाच्या अनुषंगाने सध्या तरी अनुकूल स्थिती नाही. सध्याची वाऱ्यांची दिशा बघता, पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या विरोधी वाऱ्यांमुळे मुंबईपासून पाऊस लांबच राहिल. मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला असून त्यानुसार, काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे अक्षय देवरस यांनी सांगितले.
आयएमडीने 18 ते 20 जुलै दरम्यान मुंबईला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला असून त्यानुसार, काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे 17 ते 22 जुलै दरम्यान मान्सून स्थिती कार्यरत राहिल असा अंदाज, अक्षय देवरस यांनी वर्तवला आहे.
2 दिवसांपासून राजधानीत पावसाचं धूमशान; आज मुंबईसह या जिल्ह्यांना रेड अलर्ट
शुक्रवारी पडलेल्या पावसाबाबत आयएमडी अंदाज का वर्तवू शकली नाही?
आयएमडीचे मुंबईतील प्रादेशिक अंदाज केंद्र प्रमुख जयंता सरकार यांनी सांगितले की तीव्रता (Intensity) आणि वितरण (Distribution) हे अंदाजाचे प्रमुख दोन घटक असतात. आकाशात ढगांची गर्दी सकाळी लवकर तयार झाल्याने तीव्रतेचा अंदाज देता येणं शक्य नव्हतं. परंतु आम्ही वितरणाचा अचूक अंदाज वर्तवला होता.
शुक्रवारच्या वादळी पावसाचा अंदाज कुलाब्यातील डॉपलर रडार (Doppler Radar) खराब असल्याने बांधणे अशक्य होते, असे अंदाज व्यक्त करणाऱ्या यंत्रणेने आयएमडीवर टीका करताना सांगितले. बुधवारी मुसळधार पावसामुळे रडार यंत्रणा नादुरुस्त झाली त्यामुळे फोटोंचे स्कॅनिंग दर 45 मिनिटांनी होत होते. अनिश्चित आणि तीव्र हवामानाच्या काळात तातडीने डेटा उपलब्ध होण्यासाठी हायर स्कॅन फ्रिक्वेन्सी आवश्यक असते, असं अंदाज व्यक्त करणाऱ्या यंत्रणांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IMD, IMD FORECAST, Mumbai rain, Rain, Weather