नवी दिल्ली, 27 मे: म्यूकरमायकोसिस हा एक दुर्मीळ बुरशीजन्य (Fungus) संसर्ग मानला जातो. 2019 मध्ये जर्नल ऑफ फंगीमध्ये (Journal of Fungui) प्रसिद्ध झालेल्या एका पेपरमध्ये, भारतात या आजाराचे प्रमाण दर दहा लाख लोकांमागे 140 इतकं असून, हे प्रमाण सर्वाधिक आहे. पाकिस्तानसह इतर देशापेक्षाही हे जास्त असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये Covid-19 पेक्षाही या पोस्ट कोविड आजाराने स्थिती चिंताजनक झाली आहे.
देशभरात म्यूकरमायकोसिस (Mucor mycosis) या बुरशीजन्य संसर्गाचे रुग्ण वाढत असून, आतापर्यंत 9 हजारपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी या आजारावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या लिपोसोमल अॅम्फोटेरिसिन बी (Amphotericin B ) या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या औषधाचा काळा बाजार आणि साठेबाजी होत असल्याचं उघडकीस येत असून, दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला या औषधाच्या तुटवडयाचे कारण स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. दी इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोविडवरील उपचारांमध्ये स्टिरॉइडसचा (Steroids) अतिवापर झालेल्या रुग्णांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्यानंतर पाच दिवसांनी आरोग्य मंत्रालयानं ‘काळी बुरशी’ (Black Fungus) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराची साथ रोग म्हणून घोषणा केली आणि राज्यांना या आजाराची लागण झाल्याची खात्री झालेल्या आणि संशय असलेल्या प्रत्येक रुग्णांची माहिती देणं बंधनकारक केलं.
Black Fungusच्या रुग्णांना दिलासा, भारतात Zydus Cadila आणि TLC उपलब्ध करणार औषध
22 मे रोजी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं की, देशात म्युकर मायाकोसिसचे 8 हजार 848 रुग्ण आहेत. त्यातील जवळपास निम्मे रुग्ण गुजरात (2281) आणि महाराष्ट्रात (2000) आहेत. मंगळवारी त्यात आणखी 255 रुग्णांची भर पडली आहे.
यावरील उपचार :
या आजाराचे निदान लवकर झाले आणि त्यावर तत्काळ उपचार झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होतो, असं डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर अँटी-फंगल औषधं देऊन उपचार केले जातात. तर काही वेळा बुरशी काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. अँटी-फंगल औषधामध्ये सर्वसामान्यपणे लिपोसोमल अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन वापरले जाते. ते उपलब्ध नसेल तर दुसरा पर्याय अॅम्फोटेरिसिन बी डीऑक्सिकोलेट (प्लेन) इंजेक्शन आहे तर तिसरा पर्याय फायझरनं तयार केलेलं आयसाव्यूकोनाझोल हे टॅबलेट किंवा इंजेक्शन स्वरूपातील औषध आहे. आणखी एक चौथा पर्याय आहे तो म्हणजे टॅबलेट आणि इंजेक्शन स्वरुपात येणारे पॉसॅकोनाझोल हे जेनेरिक औषध.
कोरोना लसीकरणाबाबत प्रत्येक आरोपांचं खंडन; केंद्राने दिली सर्व प्रश्नांची उत्तरं
‘आम्ही लिपोसोमल अॅम्फोटेरिसिन इंजेक्शनने याचा उपचार सुरू करतो आणि ते उपलब्ध नसेल तर इतर औषधांचा उपयोग करतो. अॅम्फोटेरिसिन बी डीऑक्सिकोलेटदेखील प्रभावी आहे, परंतु यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळं आम्ही मूत्रपिंडाचा त्रास नसलेल्या तरुण रूग्णांमध्येच याचा वापर करतो, अशी माहिती मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. तनु सिंघल यांनी दिली.
अॅम्फोटेरिसिनची टंचाई :
अॅम्फोटेरिसिनचे उपचार 4 ते 6 आठवडे करावे लागतात. याची 90 ते 120 इंजेक्शन्स द्यावी लागतात. त्यासाठी 5 ते 8 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येतो. पण सध्या देशात या औषधाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. एका रुग्णाला सरासरी 100 कुपींची आवश्यकता गृहीत धरल्यास देशात सध्या 9 हजार रुग्णांसाठी 9 ते 10 लाख इंजेक्शन्सची गरज आहे. रुग्ण संख्या वाढण्याचीही चिन्हे असल्यानं या इंजेक्शनची गरजाही वाढण्याची अपेक्षा आहे.
एकाच व्यक्तीने वेगवेगळी कोरोना लस घेणं किती सुरक्षित? केंद्राने दिली मोठी माहिती
अॅम्फोटेरिसिनचे उत्पादन भारत सीरम्स अँड व्हॅक्सीन्स, बीडीआर फार्मास्युटिकल्स, सन फार्मा, सिप्ला आणि लाइफ केअर इनोव्हेशन्स या कंपन्या करतात. तर मायलन हे औषध आयात करून भारतात त्याचा पुरवठा करते. या आजाराचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यानं याचं उत्पादनही कमी होतं. आता अचानक रुग्णसंख्या वाढल्यानं सरकारच्या मदतीनं या सर्व उत्पादक कंपन्यांनी याचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्याखेर सर्व उत्पादक अँफोटेरिसिन बीच्या 1.63 लाख कुपी तयार करतील असा अंदाज केंद्रानं 21 मे रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात वर्तवण्यात आला होता. तर 3.63 लाख कुप्या आयात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.
मानवी शरीरावर आधीपासूनच आहे अगणित फंगसचं वास्तव्य, आढळतात 80 प्रकारच्या बुरशी
केंद्रानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 10 ते 31 मे या कालावधीसाठी राज्यांना अँफोटेरिसिन बीची केवळ 67 हजार 930 इंजेक्शन्स देण्यात आली आहेत, जी त्यांच्या गरजेपेक्षा खूपच कमी आहेत.
‘आम्हाला दरमहा 3 लाख इंजेक्शन्सची गरज आहे, परंतु आम्हाला केंद्राकडून फक्त 21 हजार 590 इंजेक्शन्स मिळाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.
केंद्र सरकारनं म्हटलं आहे की, जूनमध्ये देशांतर्गत उत्पादन 2.55 लाख कुप्यांपर्यंत जाईल. आणि 3.15 लाख कुप्या आयात केल्या जातील त्यामुळं एकूण पुरवठा 5.70 लाख कुप्यांवर जाईल.
या औषधाच्या निर्मितीसाठी गेल्या आठवड्यात पाच नवीन उत्पादकांना परवाना देण्यात आला आहे. यामध्ये नेटको फार्मास्युटिकल्स (हैदराबाद), एमक्युअर फार्मास्युटिकल्स (पुणे), अलेंबिक फार्मास्युटिकल्स, ग्युफिक बायोसायन्सेस आणि लाइका फार्मास्युटिकल्स (गुजरात) यांचा समावेश आहे. परंतु या कंपन्या जुलैपासून उत्पादन सुरू करू शकतात आणि सगळे मिळून 1.11 लाख कुप्या तयार करू शकतात. त्यामुळं या औषधाची गरज भागवण्यासाठी देशाला आयातीवरच अवलंबून राहावे लागण्याची शक्यता अधिक आहे.
का येतेय अडचण?
या औषधाच्या उत्पादनात सर्वात मोठा अडथळा आहे तो दोन प्रकारच्या कच्च्या मालाच्या कमतरतेचा. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
यातील पहिला घटक आहे तो म्हणजे अॅम्फोटेरेसिन बी हा अॅक्टीव्ह फार्मास्युटिकल घटक (API). साराभाई ग्रुपच्या मालकीची सिनबायोटिक्स लिमिटेड ही याची प्रमुख पुरवठादार आहे. ‘साराभाई याचा दरमहा 25 किलो पुरवठा करू शकतात आणि त्याद्वारे 1.5 ते 2 लाख इंजेक्शन्स तयार करू शकतो, असं बीडीआर फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक धर्मेश शहा यांनी सांगितलं.
इतर उत्पादकांसाठी करारावर अॅम्फोटरेसीन बीचे उत्पादन करणारे कमला लाइफसायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. जे. झावर म्हणाले की, एपीआय हा मूलभूत घटक आहे. लिपोसोमल फॉर्म आणि प्लेन फॉर्म या दोन्हीसाठी ते आवश्यक आहे.
शहा म्हणाले की, देशांतर्गत उत्पादक सध्या नॉर्थ चायना फार्मास्युटिकल ग्रुपकडून (NCPC) एपीआय विकत घेत आहेत. जूनअखेरपर्यंत आम्हाला 40 ते 50 किलो एपीआय पुरवण्याचा वायदा केला आहे.
या अॅम्फोटेरेसिन एपीआयचा पुरवठा करण्यासाठी झेजियांग फार्माला आपत्कालीन स्थितीसाठी तात्पुरती मंजूरी देण्याची मागणी उत्पादकांनी केली असून त्याबाबत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (Drug Controller of India) पत्र लिहिलं आहे.
लिपोसोमल अॅम्फोटेरेसिन बी तयार करण्यासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे शुद्ध स्वरूपातील सिंथेटिक लिपिड. एमआरएनए लस तयार करण्यासाठी लिपिड्सला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. डिसेंबरमध्ये स्वित्झर्लंडस्थित लिपोइडला देण्यात आलेल्या ऑर्डर्सचा पुरवठा आता केला जात आहे, अशी माहिती उत्पादकांनी दिली. ‘आम्हीही त्यांच्याकडे ऑर्डर दिली आहे. पुढील 4 ते 6 आठवड्यात सर्व उत्पादकांना या कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे,’ असं शहा यांनी सांगितलं.
ब्लॅक फंगस रोगावरील उपचार खर्च कमी करण्याची मागणी, काय आहे ट्रीटमेंट?
भारतात लिपिड पुरवठा करणारी मुंबईतील व्हीएव्ही लाइफ सायन्सेस ही एकमेव कंपनी आहे. तिची मासिक क्षमता 21 किलोग्रॅम असून ऑगस्टपर्यंत ती 65 किलोपर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे, असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण केडिया यांनी सांगितलं.
कच्चा माल उपलब्ध असला तरीही, निर्जंतुकीकरण चाचणीसाठी लागणार्या वेळेव्यतिरिक्त औषधाचं उत्पादन होण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागतो.
कायदा काय सांगतो?
दिल्लीतील कोविड-19 च्या स्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) न्यायाधीश विपिन संघी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं (Bench) एका वकिलानं तोंडी नोंदवलेल्या तक्रारीनंतर एक मे रोजी या बुरशीविरोधी औषधांच्या कमतरतेची दखल घेतली.
20 मे रोजी न्यायालयानं देशात होणारी वाढती मागणी आणि देशांतर्गत उत्पादनाचे अल्प प्रमाण लक्षात घेऊन तातडीनं याची आयात करण्याची गरज व्यक्त केली. ‘केंद्राचे अपेक्षित उत्पादन आणि आयात हीदेखील रुग्णांच्या गरजेपेक्षा कमी होऊ शकते त्यामुळं मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी करण्यासाठी तातडीचे उपाय आवश्यक आहेत,’ असं सोमवारी न्यायालयानं सांगितलं.
New Coronavirus: याठिकाणी सापडला नवा कोरोना विषाणू, श्वानांमधून झालं संक्रमण
गुरुवारी न्यायालय पुन्हा हा विषय हाताळणार आहे. औषधाची उपलब्धता आणि उत्पादनाची स्थिती याचा अहवाल देण्याचा आदेश न्यायालयानं केंद्राला दिला आहे. पुढील दोन आठवड्यांत काळ्या बुरशीच्या आजाराची स्थिती काय असेल याबाबतही अंदाज देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे. ‘या औषधाची मागणी आणि उपलब्धता यातील मोठी तफावत पाहता सध्याच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही पावले पुरेशी नसल्याची भीती न्यायालयानं व्यक्त केली असून, वाढीव उत्पादन योजना प्रत्यक्षात कधी येणार हे स्पष्ट होत नसल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus, Covid-19