क्वालालांपूर, 26 मे: गेल्या वर्षी चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून पसरलेल्या कोरोना विषाणूनं (Coronavirus) सगळ्या जगाला वेठीला धरलं आहे. आतापर्यंत या विषाणूची नवनवीन रुपं समोर आली असून त्याच्या बदलत्या रचनांमुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. जगभरात कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असतानाच आता श्वानांमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. संशोधकांना मलेशियात (Malaysia) नवीन कोरोना विषाणू (CCoV-HuPn-2018) आढळून आला आहे. या विषाणूची निर्मिती श्वानांपासून (Dog) झाल्याची माहिती समोर येत असून काही वर्षांपूर्वी काही जणांना याची बाधा झाली होती. प्राण्यांपासून (Animal) माणसांना बाधित करणाऱ्या या विषाणूची पुष्टी झाल्यास असा हा आठवा विषाणू असेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तर माणसाचा सर्वात जवळचा विश्वासू मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्वानापासून माणसांमध्ये संसर्ग होणारा हा पहिलाच विषाणू असेल. नवभारत टाइम्स ने याबाबत माहिती दिली आहे. सध्या जगभरात 7 कोरोना विषाणू आहेत, जे मनुष्यामध्ये संसर्ग पसरवू शकतात. बहुतांश विषाणू सर्वात आधी वटवाघळामध्ये आढळून आले होते. कधीकधी हा विषाणू वटवाघळापासून थेट मनुष्यापर्यंत पोहोचतो, तर कधी दुसऱ्या जनावरांना संक्रमित करतो आणि पुन्हा माणसापर्यंत पोहोचतो. हे वाचा- कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात होणार मृत्यू? काय आहे या VIRAL दाव्यामागचं सत्य अन्य विषाणूंचे अस्तित्व आहे का आणि आतापर्यंत त्यांचा शोध लागला नाही आहे का असा सवालही शास्त्रज्ञांमध्ये उपस्थित केला जात आहे. गेल्या 20 वर्षांपासून विषाणूंवर संशोधन करणारे साथरोग तज्ज्ञ डॉक्टर ग्रेगरी ग्रे (Gregary Grey) यांनी आपल्या एका विद्यार्थ्याला सध्या कोरोना चाचणीसाठी प्रभावी टेस्टिंग टूल विकसित करण्याची जबाबदारी दिली होती. ग्रेगरी आणि त्यांच्या विद्यार्थ्यानं एका चाचणी किटची (Testing Tool) निर्मिती केली असून, त्याद्वारे कोरोनाच्या इतर विषाणूंचीही चाचणी करता येऊ शकते. या किटच्या सहायानं गेल्या वर्षी अनेक नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. हे वाचा- कोरोनानंतर 5 जिल्ह्यांमध्ये नव्या आजाराचं थैमान; पाहा यात तुमचा जिल्हा नाही ना? हे नमुने मलेशियातील सारवेक इथल्या एका रुग्णालयातील रुग्णांचे होते. या रुग्णांमध्ये 2017 आणि 2018 मध्ये न्यूमोनिआची लक्षणं आढळली होती. त्यांच्या अभ्यासातून श्वानांपासून माणसांमध्ये संक्रमित होणाऱ्या या नव्या विषाणूचा खुलासा झाला. या रुग्णांमध्ये बहुतांश मुलं आहेत. ग्रेगरी यांच्या संशोधन पथकानं नव्या कोरोना चाचणी किटचा वापर करून केलेल्या 301 नमुन्यांच्या चाचण्यापैकी 8 नमुने हे श्वानांपासून विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचे होते. महत्त्वाचं म्हणजे ग्रेगरी यांनी सांगितलं की, या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूंचे प्रमाण अधिक होते. ग्रेगरी यांच्या संशोधन पथकानं आपल्या निष्कर्षांच्या पुष्टीसाठी चाचणीचे परिणाम अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिर्व्हसिटीच्या (Ohio State University) विषाणूतज्ज्ञ (Virologist) अनस्तसिया व्लासोवा यांच्याकडे पाठवले. जीनोमचा बहुतांशी भाग हा श्वानांच्या कोरोनाचा अनस्तसिया व्लासोवा यांनी सांगितलं की, श्वानांमधून माणसांमध्ये कोरोना विषाणू पोहोचेल असा विचारही कधी कोणी केला नसेल. अशाप्रकारचे कोणतही प्रकरण अद्याप पुढं आलेलं नाही. अनस्तसिया व्लासोवा यांनी कोरोना विषाणूच्या जीनोमची (Genome) तपासणी केली असता त्यांना ग्रेगरी यांच्या पथकानं केलेल्या संशोधनाला सहमती दर्शवावी लागली. जीनोममधील बहुतांशी भाग हा श्वानातील कोरोना विषाणूचा आहे, असं अनस्तसिया व्लासोवा यांनी स्पष्ट केलं. मलेशियात श्वानांपासून कोरोनाबाधित झालेले सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्याशिवाय त्यांना या संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्यांच्याकडून इतरांना बाधा झाल्याचंही आढळलेलं नाही. त्यामुळे श्वानांमधील कोरोना विषाणूपासून साथ (Pandemic) पसरण्याचा धोका नाही, असंही ग्रेगरी यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.