Explainer: काहिली वाढणार; IMD ने दिला प्रखर उन्हाळ्याचा अंदाज, हे आहे कारण

Explainer: काहिली वाढणार; IMD ने दिला प्रखर उन्हाळ्याचा अंदाज, हे आहे कारण

भारतीय हवामान खात्यानं (IMD) फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या हवामान परिस्थितीच्या आधारे आणि 2003 ते 2018 दरम्यान दरवर्षी जारी केलेल्या उन्हाळ्याच्या पूर्वीच्या अंदाजांचा संदर्भ घेऊन हा अंदाज जारी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मार्च: देशात यंदाचा उन्हाळी हंगाम सुरू झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं (IMD) एक मार्च 2021 रोजी अधिकृतपणे जाहीर केलं. मार्चपासून मे महिन्यापर्यंत तापमान (Temperature) कसं राहील, याचा वेध घेणारं एक पत्रकही हवामान खात्यानं प्रसिद्ध केलं आहे. दक्षिणेकडची काही राज्यं वगळता यंदा उन्हाच्या झळा अपेक्षेपेक्षा जास्तच तीव्र असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने त्याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे.

तापमानविषयक अंदाज

मार्च, एप्रिल आणि मे या कडक उन्हाच्या महिन्यांमध्ये यंदा उत्तर भारत, ईशान्य भारत, वायव्य भारत आणि पूर्वेकडच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान (Maximum Temperature) अनुभवायला मिळणार आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेले प्रदेश, तसंच ईशान्य आणि दक्षिणेकडच्या काही राज्यांमध्ये या कालावधीतलं किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त असेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

तरीही दक्षिण आणि मध्य भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये रात्रीचं किमान तापमान (Night Minimum Temperature) सरासरीएवढंच असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

यंदाच्या फेब्रुवारीतल्या हवामानाच्या प्राथमिक स्थितीच्या आधारे आणि 2003 ते 2018 या वर्षांतल्या हवामानाच्या संदर्भानुसार हा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. एप्रिल ते जून 2021 या कालावधीतल्या हवामानाचा अंदाज एप्रिल महिन्यात जाहीर केला जाणार आहे.

यंदाचा उन्हाळा कोणत्या भागांत कडक?

यंदा मार्च ते मे या कालावधीत गंगा नदीच्या खोऱ्यांतील प्रदेश - म्हणजेच पंजाब, चंडीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान अनुभवायला मिळणार आहे.

ठाण्याचं नागपूर: पाऱ्याने गाठली चाळिशी; कुठे वाढणार झळा वाचा हवामानाचा अंदाज

या भागांतलं कमाल तापमान सर्वसाधारण दीर्घकालीन सरासरीपेक्षा (LPA) 0.71 अंश सेल्सिअसने अधिक असू शकतं, असा अंदाज आहे.

कोकण तापणार

ओडिशा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला यंदा तीव्र उन्हाळ्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये दिवसाचं तापमान सर्वसाधारण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 0.25 अंश ते 0.86 अंश सेल्सिअस अधिक असू शकतं आणि त्यात बदलही होत राहू शकतात.

प्रामुख्याने दक्षिणेकडच्या राज्यांत या कालावधीत रात्रीचं तापमान अधिक असू शकतं, असा इशाराही देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस विभागाचे प्रमुख डी. शिवानंद पै यांनी सांगितलं, 'स्थानिक परिस्थितीनुसार तयार झालेली आर्द्रतेची स्थिती किंवा पावसामुळे रात्रीचं तापमान अधिक उष्ण होऊ शकतं.'

पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांत दिवस आणि रात्रीचंही तापमान अधिक असेल, तर मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, गुजरात, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये रात्रीचं तापमान अधिक असेल.

उष्णतेच्या लाटांची संख्या?

भारतात उन्हाळ्यात काही वेळा उष्णतेच्या लाटा (Heatwaves) येत असतात. एखाद्या ठिकाणचं कमाल तापमान तिथल्या सरासरी तापमानापेक्षा चार अंश सेल्सिअसने अधिक नोंदवलं गेलं, तर उष्णतेची लाट आल्याचं जाहीर केलं जातं.

त्यामुळे भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना असलेल्या खंडप्राय देशात तीन महिन्यांच्या कालावधीत उष्णतेच्या लाटेची स्थिती किती वेळा येईल, याचा अंदाज आधी वर्तवणं अवघड आहे.

तरीही कोअर हीटवेव्ह झोनमध्ये (Core Heatwave Zone) दर वर्षीच्या उन्हाळ्यात (Summer) उष्णतेच्या लाटेची स्थिती येते, असं जुन्या नोंदी सांगतात. कोअर हीटवेव्ह झोनमध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्रातला विदर्भ भाग, पश्चिम बंगालचा गंगेकडचा भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि तेलंगण या भागांचा समावेश होतो. या राज्यांमध्ये उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे.

'कोअर हीटवेव्ह झोनमधल्या काही राज्यांमध्ये यंदा सरासरीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त वेळा उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचं पूर्वानुमान आणि तीव्रतेचा अंदाज हंगाम जसजसा पुढे सरकेल, त्यानुसार चार आठवडे आधीपर्यंत वर्तवता येऊ शकेल,' असं पै यांनी सांगितलं.

यंदा ला-निनाचा प्रभाव किती?

पॅसिफिक महासागरातल्या (Pacific Ocean) ला-निना (La Nina) या घटनेमध्ये सागराच्या पृष्ठभागाचं तापमान त्याच्या मध्य आणि विषुववृत्तीय प्रदेशात सरासरीपेक्षा कमी होतं. जेव्हा हे तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, तेव्हा त्या स्थितीला एल्-निनो (El Nino) असं म्हणतात. या दोन्ही स्थितींचा परिणाम जागतिक तापमानावर होतो.

सध्या पॅसिफिक महासागरात ला-निना ही स्थिती मर्यादित स्वरूपात आहे. त्या स्थितीचं चक्र शेवटाकडे आलं असलं, तरी आपल्याकडच्या संपूर्ण उन्हाळाभर, जूनपर्यंत ती स्थिती कायम असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

अवश्य वाचा  -  Explainer: पाकचा नवा कारनामा! काश्मीरमध्ये आढळलेले स्टिकी बॉम्ब नेमकं काय प्रकरण आहे?

'ला-निनाचा आपल्याकडच्या तापमानावर परिणाम होतोच; मात्र तापमानावर परिणाम करणारा तो एकमेव घटक नाही. वातावरणाचे आणि सागरी वातावरणाचे आणखी काही घटक, तसंच स्थानिक वाऱ्यांचे घटक या सगळ्या घटकांवर देशातल्या उन्हाळ्यातलं तापमान अवलंबून असतं,' असं पै यांनी स्पष्ट केलं.

First published: March 4, 2021, 8:00 AM IST

ताज्या बातम्या