मुंबई, 3 मार्च : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे.
गेल्या आठवड्यात तापमान जवळपास 33 अंश सेल्सिअसपर्यंत होतं. परंतु या आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली असून मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवर गेला आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशभरात लॉकडाउन लागू झालं. त्यामुळे अनेकांचा उन्हाळा घरातच गेला. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यातच उकाडा वाढला असून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, गेल्या 22 वर्षांत मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची ही तिसरी वेळ असल्याचं दिसतं आहे.
गेल्या 22 वर्षांत 28 फेब्रुवारी 1999 रोजी आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान 38.5 अंश सेल्सियस नोंदवलं गेलं होतं, त्यानंतर 18 फेब्रुवारी 2017 रोजी 38.4 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं होतं.
प्रादेशिक हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह अधिक मजबूत झाला आहे. हे गरम वारे समुद्रातून मुंबईकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांना वाहू देत नाहीत. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा मुंबईचे तापमान जास्त वाढते. त्यामुळे, सध्या तापमानात वाढ नोंदवली गेली आहे.