नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचं (BJP) सरकार आल्यापासून देशातला सर्वांत जुना पक्ष असलेल्या आणि प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसची (Congress) वाताहतच सुरू आहे. गेल्या 10 वर्षांत अपरिपक्व पक्ष नेतृत्त्वावर नाराज असलेले अनेक दिग्गज नेते बाहेर पडल्यानं पक्ष खिळखिळा झाला आहे. आता 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) डोळ्यांसमोर ठेवून आपली राजकीय समीकरणं बदलण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे.
याकरता कॉंग्रेसनं गुजरातमधले दलित नेते जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) आणि बिहारमधील कन्हैयाकुमार अशा तरुण नेत्यांना पक्षात सामील करून घेण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarindersingh) यांना राजीनामा देण्यास भाग पाडून चरणजितसिंग चन्नी (Charanjitsingh Channi) यांच्याकडे पंजाबच्या (Punjab CM) मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली आहे. या निर्णयामुळे नाराज अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे पक्षातील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. कॉंग्रेसमधून गेल्या सात वर्षांत तब्बल 222 नेते बाहेर पडले असून त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये सामील झालेल्या खासदार-आमदारांची संख्या 61 असून, इतर नेते गृहित धरल्यास 115 नेते काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. काँग्रेस सोडून गेलेल्या निवडक 11 राजकीय नेत्यांच्या सद्यस्थितीबाबतचा एक लेख भास्कर डॉट कॉमवर प्रकाशित करण्यात आला आहे.
2014 ते 2021 या सात वर्षांच्या काळात कॉंग्रेसमधील 177 खासदार आणि आमदार पक्षातून बाहेर पडले. त्यात एकेकाळी राहुल गांधी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, सुश्मिता देव अशा अनेक तरुण नेत्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे मुत्सद्दी नेतेही अखेर कॉंग्रेसमधील घुसमटीमुळे बाहेर पडले.
कॉंग्रेसचे निष्ठावान नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे पुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Patil) पाच वेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर अहमदनगर जिल्ह्यातून आमदार म्हणून निवडून आले होते. विधानसभेत विरोधी पक्ष नेते पद सांभाळणाऱ्या विखे पाटील यांनी राज्यात कॉंग्रेसचं स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र लोकसभा निवडणूकीत त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील याला कॉंग्रेसनं तिकीट नाकारल्यानं ते नाराज होते. त्यामुळं 2019मध्ये त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. तर सुजय विखे पाटील यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आता ते खासदार आहेत.
एकेकाळी राहुल गांधी यांच्या खास मर्जीतील असणारे मध्य प्रदेशचे ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Sindhiya) यांनी 2018मध्ये मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) कॉंग्रेसची सत्ता आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र त्यांच्याऐवजी कमलनाथ यांना मुख्यमंत्री पद देण्यात आल्यानं ते नाराज होते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत दिग्विजयसिंह यांनी सहकार्य न केल्यानं ग्वाल्हेर मतदारसंघात ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभव पत्करावा लागला. अखेर त्यांनीही मार्च 2020 मध्ये भाजपची वाट धरली. राज्यसभेत खासदार झाल्यानंतर आता त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद लाभलं आहे.
हेही वाचा- Explainer : काँग्रेसने खेळले 'दलित कार्ड'? 2024 च्या निवडणुकीत भाजपला देणार मात?
उत्तर प्रदेशमधील (Uttar pradesh) एक प्रभावी नेते जितेंद्र प्रसाद (Jitendra Prasad) यांचे पुत्र आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या युवा नेत्यांच्य्या तुकडीतील आघाडीचे नेते असणारे जितीन प्रसाद यांना कॉंग्रेसनं सतत डावलल्यानं काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
जितीन प्रसाद यांच्या पाठोपाठ जुलैमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranav Mukharjee) यांचे पुत्र आणि काँग्रेसचे माजी खासदार अभिजित मुखर्जी (Abhijeet Mukharjee) यांनी काँग्रेस सोडून तृणमूल कॉंग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. 2019मध्ये लोकसभा निवडणूकीत वडिलांच्या परंपरागत जंगीपूर मतदारसंघातून पराभव झाल्यानं पक्षानं त्यांना सापत्नभावाची वागणूक देण्यास सुरुवात केली होती. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने डाव्या पक्षांशी आघाडी केल्यानंही ते नाराज होते. त्यामुळं अखेर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या त्यांना कोणतंही पद देण्यात आलेलं नाही.
हेही वाचा- Explainer: केवळ 500 रुपयांमध्ये श्रीमंत व्हायचंय? कसा सुरु करणार चटणी बनवण्याचा व्यवसाय? जाणून घ्या
ऑगस्टमध्ये महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुष्मिता देब (Sushmita Dev) तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाल्या. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष मोहन देव यांची कन्या असलेल्या सुष्मिता देब राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात. त्या सिलचरमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र आसाम विधानसभा निवडणुकीत करण्यात आलेली युती आणि जागा वाटपात झालेला अन्याय यामुळे त्या नाराज होत्या. गेल्या सोमवारीच त्यांची तृणमूलच्या (TMC) बंगालमधील खासदार म्हणून राज्य सभेवर बिनविरोध निवड झाली आहे.
कॉंग्रेसचा तडफदार आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आक्रमक युवा नेत्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनीही 2019 मध्ये पक्षानं उमेदवारी न दिल्यानं कॉंग्रेसचा राजीनामा दिला. राफेल विमान खरेदी मुद्द्यासंबंधी मथुरा इथं होणाऱ्या एका पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं होतं. त्यांना एकदा पक्षातून बाहेरही काढण्यात आलं होतं. 2019मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता त्या शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार आहेत.
कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री, मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडलेले ज्येष्ठ नेते एसएम कृष्णा (SM Krishna) यांनी वयाच्या 84 व्या वर्षी कॉंग्रेस पक्ष सोडला आणि भाजपात प्रवेश केला. कॉंग्रेसनं त्यांना दुय्यम वागणूक दिल्यानं त्यांनी अखेर कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमवती नंदन बहुगुणा यांचे पुत्र विजय बहुगुणा (Vijay Bahuguna) आणि कन्या रिटा बहुगुणा (Rita Bahuguna) यांनी वडीलांसह अनेक दशकं कॉंग्रेसला साथ दिली. विजय बहुगुणा 2012 ते 2014 या काळात उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते तर रिटा बहुगुणा उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या. 2013मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे विजय बहुगुणा यांचं मुख्यमंत्री पद गेलं त्यानंतर ते भाजपमध्ये आले. त्यांचे पुत्र सौरभ बहुगुणा भाजपचे खासदार आहेत. तर रिटा बहुगुणा उत्तर प्रदेशमधील अलाहाबादच्या खासदार आहेत.
सध्या आसामचे मुख्यमंत्री (Assam CM) असणारे हेमंत बिस्व शर्मा (Hemant Biswa Sharma), 2015मध्ये आसाममध्ये कॉंग्रेसचे तरुण गोगोई यांचे सरकार असताना मंत्री होते, मात्र तरुण गोगोई यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी 30 आमदारांचे समर्थन असल्यानं आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी कॉंग्रेस हायकमांडकडे केली होती. मात्र त्याला मंजुरी देण्यात आली नाही. अखेर नाराज हेमंत बिस्व शर्मा यांनी 2015 मध्ये कॉंग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरला. आता ते आसामचे मुख्यमंत्री असून, ईशान्य भारतात भाजपचे सर्वांत मोठे नेते आहेत.
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांची ही यादी आणि त्यांची सध्याची स्थिती बघितली तर लक्षात येईल की त्यांनी घरोबा केलेला नव्या पक्षानं त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असून, त्याचा फायदा त्या त्या राज्यातील मतपेट्या आपल्या दिशेनं वळवण्यात आणि आपलं स्थान बळकट करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. कॉंग्रेसला मात्र ही पक्षाला पडलेली मोठी खिंडार बुजवण्यासाठी नव्या आयारामांचा कितपत फयदा होईल, हे येणारा काळच सांगेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.