एकच राजकीय चाल... पण सेनेला मिळाली ढाल; तर भाजपसाठी ठरली फोल

एकच राजकीय चाल... पण सेनेला मिळाली ढाल; तर भाजपसाठी ठरली फोल

Bypoll Result: पोटनिवडणुकांसाठी एकच राजकीय खेळी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी केली. पण शिवसेनेचा डाव यशस्वी ठरला तर भारतीय जनता पक्षाला मात्र त्याच डावाने तोंडावर पाडलं.

  • Share this:

मुंबई, 2 नोव्हेंबर: राजकारणात कधी कुठला डाव यशस्वी ठरेल आणि कुणाला कशी धोबीपछाड मिळेल हे सांगता येत नाही.  लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. त्यातून राजकीय डावपेचांची शिकस्त दिसली आहे. या पोटनिवडणुकांसाठी एकच राजकीय खेळी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी केली. पण शिवसेनेचा डाव यशस्वी ठरला, एवढंच नाही तर या चालीमुळे सेनेचा उमेदवार महाराष्ट्राबाहेर निवडून आला. आता शिवसेनेचा खासदार लोकसभेत महाराष्ट्राबाहेरूनही प्रतिनिधित्व करेल. दुसऱ्या एका जागेसाठी तशीच चाल करूनही भारतीय जनता पक्षाला मात्र त्याच डावाने तोंडावर पाडलं आणि हातची जागा काँग्रेसने हिरावून घेतली.

महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरची पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रतीष्ठेची केली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी 41933 मतांनी विजय मिळवला. भाजपचे सुभाष साबणे इथे पराभूत झाले. सुभाष साबणे हे मुळात शिवसेनेचे नेते होते. पण देगलूरच्या निवडणुकीआधी काही नाराजीनाट्य घडलं आणि त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपत उडी मारली.

मोदींना मोठा धक्का; काँग्रेसने भाजपकडून हिसकावली लोकसभेची जागा

भाजपने सेनेच्याच नेत्याला तिकीट देत राजकीय डाव टाकला. पण निकालावरून दिसून येतं की हा डाव फळाला आला नाही. अखेर भाजपचा तिथे पराभवच झाला.

आता अगदी तंतोतंत खेळी शिवसेनेनेही खेळली दादरा- नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीसाठी. त्यांची खेळी मात्र यशस्वी झाली. दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल (Daddra Nagar Haveli Loks Sabha bypolls result) जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 51 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेरचा लोकसभा खासदार शिवसेनेला मिळाला.

'पुन्हा निवडणुका झाल्या तर 105 वरून 40 वर येतील', जयंत पाटलांचा भाजपला टोला

वास्तविक दादरा-नगर हवेलीची जागा भाजपची. भाजपचे तिथले खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त होती. या जागेवर डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर यांना भाजपने तिकीट नाकारलं आणि तिथून महेश गावित (BJP Mahesh Gavit)यांना उमेदवारी दिली. निवडणुकीपूर्वी काही दिवस कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यांना सेनेनं उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत भाजपला धक्का बसला. सेनेच्या तिकिटावर कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित (BJP Mahesh Gavit) यांना 63,382 मते मिळाली.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 2, 2021, 5:54 PM IST

ताज्या बातम्या