मुंबई, 31 जुलै: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. पोलिस तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI)ने तात्काळ हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती आमदार अतुल भातखलकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.
हेही वाचा...सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील तपास प्रकरणात फडणवीसांचीही उडी, ED ने लक्ष घालण्याची मागणी
आमदार भातखलकर यांनी सांगितलं की, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता पार्थ अजित पवार यांनी देखील केली आहे. तसेच सुशांतची बहीण मितू सिंह हिने देखील मुंबई पोलिसांच्या तपासावर साशंकता व्यक्त केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत.
CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांना केली आहे. pic.twitter.com/qkwthvTfeA
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2020
दुसरीकडे, सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. मात्र, आता याबाबत राज्यात वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. प्रकरणी वेगाने सूत्र हलवण्यात येत आहेत. बिहार पोलिसांचं एक पथक मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून बसलं आहे. बिहार पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात सुशांत सिंह राजपूतची बहीण मितू सिंह हिची बिहार पोलिसांनी तब्बल 4 तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मितू हिने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिल्याचं समजतं.
बिहार पोलिसांनी गोरेगाव याठिकाणी एका अज्ञात ठिकाणी मितू सिंह हिचा जबाब नोंदवला. यात मितूने सर्वात आश्चर्यकारक बाब सांगितली ती म्हणजे, सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटवर रिया चक्रवर्ती ब्लॅक मॅजिक करत होती. ही बाब मितूला सुशांत सिंहच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराने सांगितली होती. तसेच सुशांतच्या आत्महत्येच्या 2 दिवसांपूर्वी सुशांत आणि रियामध्ये कडाक्याचं भांडण देखील झालं होतं, अशी माहिती मितूने पोलिसांना दिली आहे.
हेही वाचा... डिसेंबरमध्ये सुशांत घ्यायचा संशयास्पद औषधं, जिम ट्रेनरचा मोठा खुलासा
देवेंद्र फडणवीसांचीही उडी...
अभिनेता सुशांत मृत्यू प्रकरणाला आता राजकीय वळण देखील मिळताना दिसत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या वादामध्ये उडी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी, असं व्यापक जनमत आहे. पण राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखव करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लॉड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.