मुंबई, 08 डिसेंबर : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिनं बिग बॉस मराठी 4च्या घरातून एक्झिट घेतली. हाताला झालेल्या दुखापतीमुळे तेजस्विनीला घराबाहेर जावं लागलं. तिच्या जाण्यानं सर्वांनी नाराजी व्यक्त केली. तेजस्विनी घरातून बाहेर गेली असली तरी प्रेक्षकांमध्ये ती अजूनही आहे. बिग बॉसच्या या पर्वात पब्लिक विनर म्हणून तेजस्विनीचं नाव घोषित केलं आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे तेजूची बिग बॉसची ट्रॉफी हुकली. तिच्या उजव्या हाताच्या चौथ्या बोटाला बेटाकार्पलजवळ एक क्रॅक गेला आहे. त्यामुळे तेजूला झालेली ही दुखापत साधी सुधी नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. टास्कच्या वेळी तेजस्विनीच्या हाताला लागला आहे हे ती तळमळीनं ओरडून सांगत होती मात्र कोणीही त्यांचा खेळ थांबवला नाही. पण त्यांनी असं का केलं याचा खुलासा स्वत: तेजस्विनीनं केला आहे. न्यूज 18 लोकतमशी एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत ती बोलत होती.
तेजस्विनीच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर करण्यात आलं आहे. पण तिचा हात फॅक्चर नसून हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. हाताची जास्त हालचाल होऊ नये यासाठी संपूर्ण हाताला प्लास्टर करण्यात आलं आहे. तेजस्विनीला रिकव्हर होण्यासाठी आणखी 1 महिना लागू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनी हातावर उपचार घेत आहे.
हेही वाचा - Tejaswini Lonari exclusive : तेजस्विनीच्या हाताला नेमकं काय झालंय? 1-2 नाही तर इतके दिवस राहिल फ्रॅक्चर
टास्कमध्ये ओरडून सांगत असतानाही बाकीच्या सदस्यांनी गेम का थांबवला नाही हे यामागचं कारण सांगताना तेजस्विनी म्हणाली, 'टास्क खेळताना कळून येत नाही. मला जेव्हा पासून टास्क कळले तेव्हापासून मी फुल फोर्सनं मी खेळले तेव्हा मला दुखापत झाली नाही. पण त्या टास्कच्या वेळी मला कळलं की माझ्या बॉडीमध्ये काही तरी होतंय आणि मला दुखापत झाली आहे. म्हणून मी कळकळीनं सांगत होतं. पण घरातील सगळ्यांनी मला इतकं स्ट्राँग पाहिलं आहे की त्यांना वाटलं ही माझी स्ट्रॅटेजी आहे'.
तेजस्विनी पुढे म्हणाली, 'मी जेव्हा त्यांना या गोष्टीचा जाब विचारला, की मी तुम्हाला सांगूनही तुम्ही का नाही थांबलात. त्यावर त्यांनी सांगितलं की, आम्हाला तू खूप स्ट्राँग वाटलीस. ही तुझी स्ट्रँटेजी असेल आणि म्हणून तू खोटं बोललीस'.
'ही त्यांची बाजू आहे मला मान्य आहे. कारण मी कधीच कोणाकडून काहीच अपेक्षा करत नाही. मला लागलं आहे म्हणून मला सहानभूती दाखवावी, मला लागलं आहे म्हणून माझ्या बाजूनं कोणी खेळावं, असं मला कधीच वाटलं नाही. त्यामुळे माझ्यासाठी तेव्हा कोणी उभं राहिलं नाही याचं मला अजिबात वाईट वाटत नाहीये', असंही तेजस्विनी म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news