मुंबई, 20 जानेवारी: लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते ’ पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. मालिकेची कथा पुन्हा एकदा अरुंधती आणि आशुतोष यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अरुंधतीच्या आयुष्यात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. सध्या मालिकेत अभि आणि अनघाचा विषय मागे पडला असून अरुंधती आणि आशुतोष वर भर देण्यात येत आहे. नुकताच मालिकेत नवा ट्विस्ट आला होता. अनिरुद्धने मुद्दामहून अनुष्काला आशुतोष आणि अरुंधतीचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. आता मात्र सगळी संकटं संपून एवढे दिवस प्रेक्षकांना ज्याची उत्सुकता होती तेच घडणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. अरुंधतीच्या पाठीमागे कोणीही उभं राहील नाही तरी तिचा लेक यश कायम तिच्यासोबत असतो. यश अरुंधतीला आशुतोषवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करतो. एवढंच नाही तर अरुंधतीचं आशुतोषवर प्रेम आहे याची जाणीव देखील यशनेच तिला करून दिली. आता देखील तोच आपल्या आईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. हेही वाचा - बिग बॉस नंतर पुन्हा एकत्र दिसणार किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर; ‘हे’ आहे कारण एकीकडे अरुंधतीला यशचा पाठींबा मिळतोय तर दुसरीकडे आशुतोषला त्याची आई प्रोत्साहित करतेय. यश आणि आशुतोषची आई दोघांनाही आता तुम्ही एकमेकांना सांगून टाकायला हवं असं सांगतात. आणि दोघेही एकमेकांना फोन करतात. त्यानंतर अरुंधती आशुतोषला भेटते. त्यांना ‘मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे.’ असं सांगते. तेव्हा आशुतोष फारच आनंदी होतो. तो म्हणतो, ‘तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची खात्री मी तुला देतो अरुंधती.’ अखेर आता दोघांच्याही मनातील प्रेम ओठांवर आलं असून लवकरच मालिकेत या दोघांच लग्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे अनिरुद्धचा डाव फसला आहे. त्यामुळे तो चांगलाच बिथरला आहे. अरुंधती घरी येताच तो तिला विचारतो, ‘मग कधी आहे लग्न’ त्यावर अरुंधती म्हणते कि, ‘मी सगळं स्वतः सांगेन तुम्हाला पण वेळ आल्यावर’. त्यामुळे अनिरुद्ध आता मालिकेत कोणतं वादळ आणतो का ते पाहणं महत्वाचं आहे. तसंच अनिरुद्धच्या या वागण्यामुळे संजना देखील भडकली आहे. ती त्याला म्हणते, ‘तू जेवढं तिचा वाईट करायला जातोस तितकंच तिचं भलं होतंय. हरलास अनिरुद्ध परत हरलास’ हे ऐकून अनिरुद्धला चांगलाच राग येतो. आता अनिरुद्ध पुढे नेमकं काय पाऊल उचलणार ते बघणं महत्वाचं आहे. अनिरुद्धच्या या वागण्यामुळे संजना आणि त्याच्यात आता कायमचा दुरावा येणार का ते पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
अरुंधती दुसऱ्या व्यक्तीसोबत पुन्हा संसार थाटणार ही गोष्ट अनिरुद्धला मान्य होणार का? देशमुखांच्या घरातल्यांसोबतच मालिकेचे प्रेक्षक अरुंधतीच्या या निर्णयाला पाठिंबा देणार का, अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न अखेर होणार का हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एकीकडे घरात अभि आणि अनघाचं नातं तुटत असताना अरुंधती स्वतःच नवं नातं कसं जुळवणार, तिच्या या निर्णयात घरातील सगळे तिला साथ देणार का हे पाहणं महत्वाचं आहे.