मराठी मालिका विश्वात गेले काही महिने वर्चस्व गाजवणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते (Aai kute kay karte). मनोरंजन विश्वात या मालिकेमुळे एक वेगळं कथानक आलं. स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका गेले काही महिने सुरू आहे. अनिरुद्ध- अरुंधती यांचा 25 वर्षांचा संसार अचानक अनिरुद्धच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यावर मोडतो. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या देशमुखांच्या घरात यामुळे वादळ येतं. अरुंधतीला घटस्फोट देऊन संजनाशी अनिरुद्ध लग्न करतो आणि हे वादळ घरात येतं. या नव्या नात्याला घरातले इतर सदस्य कसे निभावतात, त्यांच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाच्या आयुष्यातली वैयक्तिक उपकथानकं असा भाग आई कुठे काय करते या मालिकेत सुरू आहे.
आई कुठे काय करते ही मालिका TRP मध्ये अनेक आठवडे वरच्या स्थानावर होती. या मालिकेला सोशल मीडियावरसुद्धा खूप प्रेक्षक फॉलो करतात. मालिकेत आशुतोषच्या एंट्रीनंतर एक मोठा ट्विस्ट दाखवण्यात आला. अरुंधतीच्या कॉलेजमधला मित्र, अशी आशुतोषची ओळख. स्वयंपूर्ण, कुठल्याही पुरुषाच्या आधाराशिवाय जगण्याचं अरुंधती ठरवत असतानाच आशुतोषचं आगमन झालं आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये नवं नातं फुलणार का, देशमुख सदस्यांची त्यावर काय प्रतिक्रिया असणार. अरुंधतीच्या मुलांना आईचा मित्र किती भावतो, त्यांची काय समीकरणं तयार होतात, हा ट्रॅक मालिकेत रंजकता निर्माण करत आहे.
मूळातली बंगाली मालिका श्रीमोयीवर आधारित ही मालिका आहे. स्टार जलसा वाहिनीवर ही बंगाली मालिका प्रदर्शित होत होती. मराठीशिवाय कानडी, मल्याळम, तेलुगू, तमीळ आणि हिंदी भाषांतही या मालिकेचा रिमेक झाला आहे. मधुराणी गोखले प्रभुलकर आणि मिलिंद गवळी या प्रसिद्ध अभिनेत्यांमुळे मालिकेला वेगळं वलय मिळालं आहे.