पाकविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या मार्गातील 3 अडथळे
मेलबर्न, 22 ऑक्टोबर: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी20 वर्ल्ड कप मधील हाय व्होल्टेज सामना 23 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. दोन्ही संघांची नजर हा सामना जिंकून विश्वचषकात चांगली सुरुवात करण्याकडे राहील. उभय संघातल्या गेल्या 5 सामन्यात तीन भारतानं तर 2 पाकिस्ताननं जिंकले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणत्याही एका संघाला हॉट फेव्हरेट म्हणता येणार नाही. असं असलं तरी जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतात तेव्हा आधीच्या आकड्यांचा फारसा फरक पडत नाही. ज्या दिवशी जो संघ चांगला खेळतो तो चॅम्पियन ठरतो. टीम इंडियासमोरचे 3 अडथळे अशा स्थितीत मेलबर्नमध्ये होणाऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानच्या त्रिकुटाचा बंदोबस्त करावा लागणार आहे. जर टीम इंडियाला या त्रिकुटाला रोखता आलं नाही कर गेल्या टी20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेणं कठीण जाईल. पण पाकिस्तानचे हे त्रिकुट धोकादायक का आहे? आणि ते भारतासाठी अडचणीचं कसं ठरू शकतं ते जाणून घेऊयात.
मोहम्मद रिझवान या त्रिकुटातला पहिला खेळाडू आहे मोहम्मद रिझवान. आयसीसी टी20 क्रमवारीत रिझवान पहिल्या नंबरवर आहे. यंदा टी20 क्रिकेटमध्ये रिझवाननं दमदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या नंबरवर आहे. यंदाच्या वर्षात त्यानं आतापर्यंत 18 सामन्यात 126 च्या स्ट्राईक रेटने आणि 55 च्या सरासरीने 821 धावा केल्या आहेत. त्यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे. हेही वाचा - Ind vs Pak: क्रिकेट चाहत्यांसाठी मेलबर्नमधून आली गुड न्यूज, भारत-पाक सामन्यात… बाबर आझम मोहम्मद रिझवाननंतर कर्णधार बाबर आझमनं या वर्षात टी20 मध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. आयसीसी क्रमवारीतही तो तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्षात आतापर्यंत त्याने 19 टी20 डावांत 132 च्या स्ट्राईक रेटने 611 धावा केल्या आहेत. त्यानं एक शतक आणि 4 अर्धशतकं ठोकली आहेत. बाबरने गेल्या टी20 विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात रिझवानसोबत पहिल्या विकेटसाठी 152 धावांची भागीदारी केली होती. त्या सामन्यात त्यानं 68 धावा केल्या होत्या. त्यामुळे बाबरची विकेटही महत्वाची ठरणार आहे.
शाहीन आफ्रीदी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीनंतर टी20 वर्ल्ड कपमधून पुनरागमन करतोय. अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने ज्या प्रकारची वेगवान गोलंदाजी केली ते पाहिल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन या गोलंदाजाबाबत सावध होईल. शाहीनने गेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताची आघाडीची फळी माघारी धाडली होती. त्यामुळे टीम इंडिया सुरुवातीलाच बॅकफूटवर गेली. यंदा ऑस्ट्रेलियातल्या बाऊन्सी खेळपट्ट्या शाहीन आफ्रिदीसाठी अनुकूल आहेत.
एकूणच महामुकाबल्यात या तिघांना रोखणं भारतासाठी महत्वाचं आहे. या तिघांवर वर्चस्व मिळवलं तर टीम इंडियाला हा सामना जिंकणं फारसं कठीण ठरणार नाही.