भारतीय संघाचं प्रॅक्टिस सेशन
पर्थ, 8 ऑक्टोबर: मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचताच पर्थच्या वाका स्टेडियमवर टीम इंडियानं सरावालाही सुरुवात केली आहे. रोहित अँड कंपनीचा वर्ल्ड कपमधला सलामीचा सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्याआधी भारतीय संघ दोन सराव सामनेही खेळणार आहे. पण त्याआधी भारतीय संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियातल्या वातावरणाशी एकरुप होत आहेत. बीसीसीआयनं नुकतास सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भारतीय संघातले सगळे खेळाडू पर्थच्या वाका स्टेडियमवर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दिसतंय की भारतीय खेळाडू जॉगिंग करत आहेत. बीसीसीआयनं कॅप्शनमध्ये म्हटलंय… टीम इंडियाचं वाका मैदानात एक हलकंसं ट्रेनिंग सेशन पार पडलं. ज्यात आमचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांनी टी20 वर्ल्ड कपपूर्वी तयारीच्या दृष्टीनं काही गोष्टी सांगितल्या. 10 आणि 13 ऑक्टोबरला प्रॅक्टिस मॅच भारताचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांच्या मते नेहमी मोठ्या टूर्नामेंटमध्ये अनेकदा संघांना थेट स्पर्धेत उतरावं लागतं. पण ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपआधी सराव सत्रादरम्यान सामने आयोजित केल्यानं खेळाडूंना त्याचा फायदा होईल. भारतीय संघ नियोजित सराव सामन्यांव्यतिरिक्त 10 आणि 13 ऑक्टोबरला भारतीय संघ अतिरिक्त सामने खेळणार आहे. 13 ऑक्टोबरनंतर भारतीय संघ ब्रिस्बेनला रवाना होईल. तिथे 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सामना होईल.
हेही वाचा - Womens Asia Cup: पाकिस्तानचा राग बांगलादेशवर, आशिया कपमध्ये लेडी सेहवागनं केली ‘ही’ कमाल पुढचे 8 दिवस खास… सोहम देसाई यांनी पुढे म्हटलंय की ‘पुढचे आठ दिवस भारतीय संघासाठी खास ठरणार आहेत. मी संघव्यवस्थापनाचे आभार मानतो कि स्पर्धेच्या तयारीसाठी आम्हाला इतका वेळ दिला आहे. कारण नेहमी असं होतं की तुम्हाला थेट सामने खेळावे लागतात. पण पुढच्या आठ दिवसात वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघाची तयारी पूर्ण करुन घेतली जाईल.