अंतिम टी20 साठी टीम इंडिया सज्ज
इंदूर, 4 ऑक्टोबर: रोहित शर्माच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका गुवाहाटीतच जिंकली असली तरी मंगळवारी टीम इंडिया क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टी 20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनानं आघाडीचा फलंदाज विराट कोहली आणि उपकर्णधार लोकेश राहुल यांना अंतिम सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकर श्रेयस अय्यरला इंदूरच्या सामन्यात खेळवलं जाण्याची जास्त शक्यता आहे. विराट आणि राहुलला विश्रांती दिल्यानं रोहितबरोबर सलामीसाठी रिषभ पंत किंवा सूर्यकुमार यादवला बढती मिळू शकते. सिराज- उमेश यादवला संधी मिळणार? ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण कोरोना झाल्यामुळे दोन्ही मालिकांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. सध्या कोरोनातून बरा झाल्यानंतर शमीनं सरावाला सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपसाठीच्या स्टँड बाय खेळाडूंमध्ये शमीचा समावेश आहे. पण त्याच्याजागी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आलं आहे. दीपक चहर किंवा अर्शदीपला विश्रांती देऊन उमेश यादवचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. हेही वाचा - T20 World Cup Breaking: भारताच्या ‘मिशन वर्ल्ड कप’ला धक्का, अखेर बीसीसीआयनं बुमराबाबत दिली ही मोठी अपडेट दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून दुखापतीमुळे संघाबाहेर पडलेल्या जसप्रीत बुमराच्या जागी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इंदूरच्या तिसऱ्या टी20त हर्षल पटेल किंवा अर्शदीप सिंगच्या जागी सिराजला अंतिम अकरात खेळवलं जाऊ शकतं. तर अश्विनऐवजी युजवेंद्र चहलला मॅच प्रॅक्टिस देण्याचा भारतीय संघव्यवस्थापनाचा विचार राहिल.
क्लीन स्वीपचा निर्धार गेल्याच आठवड्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला टी20 मालिकेत 2-0 अशी मात दिली होती. पण आता दक्षिण आफ्रिकेला 3-0 असा क्लीन स्वीप देण्याची संधी भारतासमोर आहे. इंदूरमध्ये सामन्यासह मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरेल. भारताची संभाव्य प्लेईंग XI : रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमेश यादव