टीम इंडियाला वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा दणका
पर्थ, 13 ऑक्टोबर: टीम इंडिया मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाली. पण भारतीय संघाच्या वर्ल्ड कपच्या तयारीला एक मोठा धक्का बसला आहे. आज भारतीय संघानं वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दुसरा सराव सामना खेळला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत टीम इंडिया बलाढ्य भासत होती. पण या सामन्याचा निकाल पाहता भारतीय संघ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासमोर कमी पडला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव खेळले नसले तरी लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, दीपक हुडासह अनुभवी खेळाडूंचा या संघात समावेश होता. पण तरीही भारतानं हा सामना तब्बल 36 धावांनी गमावला. पहिल्या सराव सामन्यातही भारतानं अवघ्या 13 धावांनी निसटता विजय मिळवला होता. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संघात अनेक खेळाडू हे प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेट खेळणारे होते. लोकेश राहुलचं अर्धशतक पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं 168 धावा केल्या. वेस्टर्न ऑस्ट्रेलियासमोर अश्विनचा अपवाद वगळता भारतीय आक्रमण तितकं प्रभावी ठरलं नाही. अश्विननं 32 धावात 3 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलनं 2 आणि अर्शदीपनं एक विकेट घेतली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून हॉब्सनं 64 तर डी आर्सी शॉर्टनं 52 धावा फटकावल्या.
त्यानंतर 169 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा लवकर माघारी परतला. पण लोकेश राहुलनं एका बाजूनं किल्ला लढवला. त्यानं 55 बॉल्समध्ये 74 धावांची खेळी केली. पण दुसऱ्या बाजूनं भारतीय फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्या मैदानात उतरला. त्यानं वेगानं धावा करण्याचा प्रयत्न केला. पण टीम इंडिया विजयापासून बरीच दूर राहिली. 20 ओव्हर्समध्ये भारताला 8 बाद 132 धावाच करता आल्या. हेही वाचा - T20 World Cup: एअरपोर्टवर शार्दूल ठाकूरचा पारा चढला… हरभजनची मध्यस्थी पण नेमका काय घडला ड्रामा? रिषभ पंत पुन्हा फेल दरम्यान टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन रिषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. गेल्या सामन्यात तो 16 बॉलमध्ये 9 धावा करुन बाद झाला होता. आणि आजही त्यानं केवळ 11 बॉलमध्ये 9 रन्स केले. त्यामुळे वर्ल्ड कप सामन्यात अंतिम अकरात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कार्तिकचं पारडं जड वाटत आहे.
17-19 ऑक्टोबरला सराव सामने दरम्यान भारतीय संघ 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये मेलबर्नमध्ये महामुकाबला रंगणार आहे.