किंग कोहलीसोबत रोहितचं खास सेलिब्रेशन
मेलबर्न, 23 ऑक्टोबर: थरारक… रोमहर्षक आणि अविश्वसनीय… टीम इंडिया नं मेलबर्नमध्ये आज जो काही पराक्रम गाजवला त्याचं थोडक्यात वर्णन करायचं तर हे तीन शब्द पुरेसे आहेत. क्रिकेटमध्ये जोपर्यंत सामन्याचा शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकणार आणि कोण हरणार हे सांगणं कठीण. त्यात भारत-पाकिस्तानसारखा हाय व्होल्टेज मुकाबला असेल तर प्रत्येक बॉलनंतर सामना उत्कंठावर्धक होत जातो आणि मेलबर्नच्या मैदानातही तेच घडलं. 160 धावांचं टार्गेट, 4 बाद 31 अशी स्थिती आणि त्यानंतर टीम इंडियाचा सनसनाटी विजय. टीम इंडियानं आज पाकिस्तानला हरवलं आणि मेलबर्नसह भारतातही लोक रस्त्यावर उतरुन जल्लोष करु लागली. त्यात दिवाळी असल्यानं या जल्लोषाला आणखी चार चाँद लागले. टीम इंडियानं भारतीयांची दिवाळी गोड केली पण त्यामागे मोठं योगदान होतं ते माजी कर्णधार विराट कोहलीचं. रोहित, सूर्या, राहुल अशी आघाडीची फळी कोसळ्यानंतरही विराटनं हार्दिकच्या साथीनं भारताला सावरलं आणि एक ऐतिहासिक विजय टीम इंडियाला मिळवून दिला. त्यानंतर मैदानातच रोहितनं विराटला शाबासकी दिली तो क्षण पाहण्यासारखा होता. रोहितकडून शाबासकीची थाप टीम इंडियानं विजय साजरा केल्यानंतर रोहित शर्मा मैदानात धावत आला आणि त्यानं विराटला चक्क उचलून घेतलं. विराट आणि रोहितच्या ‘ब्रोमॅन्स’चा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हार्दिकही जोरात जल्लोष करताना दिसतोय.
मेलबर्नमध्ये ‘विराट’ इनिंग 160 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातीला 4 बाद 31 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. नसीम शाह आणि हॅरिस रौफनं भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. रोहित आणि राहुल प्रत्येकी 4 धावांवर माघारी परतले. त्यानंतर सूर्यकुमार यादव (15) आणि अक्षर पटेल (2) फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. त्यानंतर विराट आणि हार्दिक पंड्यानं टीम इंडियाचा डाव सावरला. इतकच नव्हे तर दोघांनीही शतकी भागीदारीही साकारली. विराट आणि हार्दिकनं केलेली 113 धावांची भागीदारी टीम इंडियाच्या विजयात मोलाची ठरली. विराटनं 53 बॉल्समध्ये नाबाद 82 धावा केल्या. तर हार्दिकनं 40 धावांचं योगदान दिलं.
हेही वाचा - Ind vs Pak: महामुकाबल्याआधी राष्ट्रगीतावेळी रोहित शर्मा का झाला भावूक? Video व्हायरल टीम इंडियाची दमदार गोलंदाजी त्याआधी भारतीय गोलंदाजांनी वर्ल्ड कप मोहिमेतल्या या सलामीच्या सामन्यात दमदार सुरुवात केली. टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगनं आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळताना कमाल केली. त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला शून्यावरच माघारी धाडलं आणि भारताच्या वाटेतला मोठा अडसर दूर केला. त्यानंतर त्यानं भारताला आणखी एक यश मिळवून देताना रिझवानलाही 4 धावांवर बाद केलं. अर्शदीपनं आपल्या 4 ओव्हर्समध्ये 32 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय हार्दिक पंड्यानं 3 तर शमी आणि भुवनेश्वरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानकडून शान मसूद (ना. 52 ) तर इफ्तिकार अहमदनं (51) धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 8 बाद 159 धावांची मजल मारता आली.