टीम इंडियाची नेदरलँडवर मात
सिडनी, 27 ऑक्टोबर: टीम इंडिया नं सिडनीत नेदरलँडचा 56 धावांनी पराभव करुन सेमी फायनलच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतानं दिलेल्या 180 धावांच्या आव्हानासमोर नेदरलँडचा संघ 123 धावाच करु शकला. त्यामुळे टीम इंडियानं वर्ल्ड कपच्या मैदानात सलग दुसरा सामना जिंकून पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. सध्या टीम इंडियाच्या खात्यात 4 गुण असून दक्षिण आफ्रिका 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाची प्रभावी गोलंदाजी 180 धावांचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँडला भारतीय गोलंदाजांनी फारशी संधीच दिली नाही. भारताच्या भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अश्विन आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर शमीनं एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारनं तर टी20 क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा एकाच सामन्यात 2 ओव्हर मेडन टाकल्या.
विराटचं नाबाद अर्धशतक त्याआधी विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि कॅप्टन रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकांमुळे टीम इंडियानं 2 बाद 179 धावा उभारल्या. सलामीवीर लोकेश राहुल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. आजच्या सामन्यात 9 धावा करुन तो बाद झाला. त्यामुळे तिसऱ्याच ओव्हरमध्ये विराट कोहली मैदानात आला. विराट आणि रोहितनं टीम इंडियाचा डाव पुढे नेला. रोहितनं 39 बॉलमध्ये 53 धावांची खेली केली. त्यानं विराटसह दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी साकारली. रोहित बाद झाल्यानंतर विराटनं सूर्यकुमारच्या साथीनं खेळाची सूत्र आपल्या हाती घेतली.
हेही वाचा - BCCI: बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय, आता पुरुषांसह महिला क्रिकेटर्सना मिळणार इतकं मानधन… विराटनं सिडनीच्या मैदानात यंदाच्या वर्ल्ड कपमधलं आपलं दुसरं अर्धशतक साजरं केलं. विराटनं नाबाद 62 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवनं डावाच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर ठोकून आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्यानं अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 51 धावा फटकावल्या. त्या दोघांनी 95 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.