हार्दिक पंड्याला विश्रांती मिळणार?
सिडनी, 25 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियानं विजयी सलामी दिली. त्यानंतर टीम इंडियाचं पुढचं आव्हान आहे ते नेदरलँड. भारतीय संघ 27 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर नेदरलँडविरुद्ध सुपर 12 फेरीतला आपला दुसरा सामना खेळणार आहे. पण या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अष्टपैलू कामगिरी बजावलेल्या हार्दिक पंड्याला स्पर्धेतल्या महत्वाच्या सामन्यांपूर्वी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध पंड्यानं आधी 30 धावात 3 विकेट्स आणि त्यानंतर 40 धावांची मोलाची खेळी केली होती. यादरम्यान स्नायूंच्या दुखण्यानं तो झगडतानाही दिसला. कारण ऑस्ट्रेलियातली मैदानं खूप मोठी आहेत. आणि फलंदाजीवेळी अनेकदा जास्तीत जास्त रन्स धावून पूर्ण करावे लागतात. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी हार्दिकला पुढच्या सामन्यात विश्रांती मिळू शकते.
दीपक हुडाला संधी? भारत आणि नेदरलँड संघातल्या सामन्यात हार्दिकच्या जागी दीपक हुडाचा पर्याय टीम इंडियाकडे आहे. जो मधल्या फळीत बॅटिंगसह ऑफ स्पिन बॉलिंगही करू शकतो. आज झालेल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये त्यानं नेट्सममध्ये बराच वेळ सरावही केला.
राहुलकडून मोठ्या अपेक्षा मेलबर्नमधल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. त्यानंतर टीम इंडिया आता सिडनीत दाखल झाली आहे. आज विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, दीपक हुडा यांनी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर नेट सेशनच्या 2 तासात भरपूर घाम गाळला. टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलकडून आता पुढच्या सामन्यात मोठ्या अपेक्षा आहेत. कारण मोठ्या सामन्यांमध्ये राहुल संघासाठी योगदान देऊ शकलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या ४ पैकी ३ सामन्यांत तो एकेरी धावा करुन बाद झाला होता. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला राहुल महामुकाबल्यात मात्र दडपणाखाली दिसला. हेही वाचा - T20 World Cup : सेमी फायनलमध्ये खेळणार या 4 टीम! सौरव गांगुलीची भविष्यवाणी तीन सामने जिंका, सेमी फायनल गाठा सुपर 12 फेरीच्या ग्रुप 2 मध्ये भारताचा आता नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या संघांशी सामना होणार आहे. पण त्यापैकी तीन सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवल्यास सेमी फायनलचं तिकीट पक्क होईल.