मुंबई, 24 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या बॉलवर थरारक विजय झाला आहे. विराट कोहली भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. विराटने 53 बॉलमध्ये नाबाद 82 रन केले, यात 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलला पोहोचणाऱ्या 4 टीमबाबत भविष्यवाणी केली आहे.
आपण भूतकाळात काय घडलं, हे पाहण्यापेक्षा वर्तमानात काय सुरू आहे, त्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं सौरव गांगुली इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाला. भारत स्पर्धा जिंकू शकणाऱ्या प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. जिंकेल कोण हे सांगणं कठीण आहे, पण आपली टीम मजबूत आहे, टीममध्ये मोठे हिटर आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये असणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.
'भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सेमी फायनलला खेळतील, असं मला वाटतं. दक्षिण आफ्रिकेकडे चांगली बॉलिंग आहे. ऑस्ट्रेलियामधली परिस्थिती त्यांना मदत करेल,' अशी भविष्यवाणी गांगुलीने केली. गांगुलीने मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप फायनलला पोहोचलेल्या न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये समावेश केलेला नाही. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 89 रननी पराभव केला आहे, त्यामुळे किवी टीमचा नेट रनरेट सर्वाधिक आहे.
सुपर-12 च्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा, इंग्लंडने अफगाणिस्तानचा, भारताने पाकिस्तानचा, बांगलादेशने नेदरलँड्सचा पराभव केला आहे, तर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांचातला सामना पावसामुळे होऊ शकला नाही, त्यामुळे दोन्ही टीमना एक-एक पॉईंट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.