विराट कोहली आणि रोहित
मुंबई, 03 ऑक्टोबर: रोहित शर्माच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 अशा फरकानं खिशात घातली आहे. त्यामुळे या मालिकेतला उद्या होणारा अखेरचा सामना औपचारिक स्वरुपाचा असेल. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ लगेचच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. दरम्यान अखेरच्या टी20त भारतीय संघात नक्कीच मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला वर्ल्ड कपआधीच्या या शेवटच्या सामन्यातून विश्रांती दिली जाणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात संधी मिळू शकते. विराटचं दमदार प्रदर्शन आशिया कपपासून जुना विराट कोहली पुन्हा पाहायला मिळत आहे. विराट पुन्हा फॉर्मात परतल्यानं भारतीय गोटात समाधानाचं वातावरण आहे. त्यामुळे वर्ल्डकपआधी त्याला इंदूरमध्ये विश्रांती दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी टी20त विराटनं नाबाद 49 धावांची खेळी केली होती. याच सामन्यात त्यानं टी20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. विराटसह लोकेश राहुललाही या सामन्यातून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. शमी-सिराजला संधी मिळणार? ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण कोरोना झाल्यामुळे दोन्ही मालिकांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. सध्या कोरोनातून बरा झाल्यानंतर शमीनं सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अखेरच्या टी20त त्याला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. वर्ल्ड कपसाठीच्या स्टँड बाय खेळाडूंमध्ये शमीचा समावेश आहे. हेही वाचा - Ind vs SA T20: गुवाहाटीत टीम इंडिया जिंकली पण रोहितचं टेन्शन पुन्हा वाढलं… पाहा नेमकं काय झालं? दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून दुखापतीमुळे संघाबाहेर पडलेल्या जसप्रीत बुमराच्या जागी मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इंदूरच्या तिसऱ्या टी20त हर्षल पटेल किंवा अर्शदीप सिंगच्या जागी सिराजला अंतिम अकरात खेळवलं जाऊ शकतं. तर अश्विनऐवजी युजवेंद्र चहलला मॅच प्रॅक्टिस देण्याचा भारतीय संघव्यवस्थापनाचा विचार राहिल. हेही वाचा - Ind vs SA T20: कॅप्टन असावा तर असा… नाकातून वाहत होतं रक्त, तरीही तो सेट करत होता फिल्डिंग, Video दीपच चहर प्रभावी ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपसाठी स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेश असलेला वेगवान गोलंदाज दीपक चहरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही सामन्यात प्रभावी कामगिरी बजावली आहे.पहिल्या टी20त त्यानं दोन विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या टी20त विकेट मिळाली नसली तरी 4 ओव्हरमध्ये त्यानं केवळ 24 धावाच दिल्या होत्या. आगामी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत चहरला संधी मिळाली आहे. त्यानंतर तो वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.