जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs SA T20: गुवाहाटीत टीम इंडिया जिंकली पण रोहितचं टेन्शन पुन्हा वाढलं... पाहा नेमकं काय झालं?

Ind vs SA T20: गुवाहाटीत टीम इंडिया जिंकली पण रोहितचं टेन्शन पुन्हा वाढलं... पाहा नेमकं काय झालं?

गुवाहाटी टी20 सह भारतानं मालिकाही जिंकली

गुवाहाटी टी20 सह भारतानं मालिकाही जिंकली

Ind vs SA T20: टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर तब्बल 238 धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण या भल्या मोठ्या आव्हानाचा दक्षिण आफ्रिकेनं पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांचे प्रयत्न 16 धावांनी अपुरे पडले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

गुवाहाटी, 2 ऑक्टोबर: डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉकच्या झुंजार शतकी भागीदारीनंतरही टीम इंडियानं गुवाहाटी टी20त दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. या विजयासह भारतीय संघानं पहिल्यांदाच भारतीय भूमीत दक्षिण आफ्रिकेला टी20 मालिकेत हरवण्याचा पराक्रम गाजवला. रोहित शर्माच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर तब्बल 238 धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण या भल्या मोठ्या आव्हानाचा दक्षिण आफ्रिकेनं पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांचे प्रयत्न 16 धावांनी अपुरे पडले. दुसरीकडे 237 धावा उभारुनही बॉलर्सच्या खराब कामगिरीमुळे रोहित शर्माचं टेन्शन पुन्हा वाढलं असणार एवढं नक्की. मिलर-डी कॉकची झुंजार भागीदारी 238 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 बाद 5 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर अनुभवी क्विंटन डी कॉकनं एडन मारक्रम आणि त्यानंतर डेव्हिड मिलरच्या साथीनं दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या जवळ नेलं. मारक्रमनं 33 धावा केल्या. पण मारक्रम आऊट झाला आणि दक्षिण आफ्रिकेची गाडी डी कॉक-मिलरनं पुढे नेली. या दोघांनी 174 धावांची अभेद्य धावांची भागीदारी केली. या दोघांनी भारतीय बॉलर्सवर चांगलच आक्रमण केलं. मिलरनं अधिक आक्रमकपणे खेळताना आपलं शतकही साजरं केलं. तर डी कॉकनंही नाबाद 69 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं 238 धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 221 धावांची मजल मारली.

जाहिरात

डेव्हिड मिलरची ‘किलर इनिंग’ दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलरचं शतक हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. 238 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन संघ इतकी मोठी मजल मारेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण डेव्हिड मिलरच्या इनिंगमुळे गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेनं चांगलीच फाईट दिली. मिलरनं अवघ्या 37 बॉल्समध्ये 8 फोर आणि 7 सिक्ससह नाबाद 106 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली मिलरचं हे दुसरं शतक ठरलं.

हेही वाचा -  Ind vs SA T20: नियम बदलले पण अम्पायर विसरले… पाहा गुवाहाटीत अम्पायर्सनी केली ही चूक भारतीय बॉलिंग पुन्हा निष्प्रभ 237 धावा स्कोअर बोर्डवर लावल्यानंतरही भारतीय बॉलर्सना दक्षिण आफ्रिकेला पूर्णपणे दबावात टाकता आलं नाही. तिरुअनंतपूरममध्ये भारतीय आक्रमण प्रभावी ठरलं. पण बॉलर्सनं तोच फॉर्म कायम ठेवता आला नाही. पहिल्या टी20त मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या अर्शदीप सिंगनं या सामन्यात 4 ओव्हरमध्ये तब्बल 62 रन्स दिले आणि दोन विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेलही महागडा ठरला. (1-57) पुन्हा एकदा 19 व्या ओव्हरमध्ये भारतीय बॉलरनं 24 रन्स दिले. त्यामुळे रोहितसमोर आगामी टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं गोलंदाजी ही महत्वाची समस्या ठरणार आहे. हेही वाचा -  Ind vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, आयपीएल गाजवणारा ‘हा’ खेळाडू टीम इंडियात ऐतिहासिक मालिकाविजय तीन सामन्यांच्या या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतीय संघानं पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका जिंकली. 2015-16 च्या मोसमात दक्षिण आफ्रिकन संघ टी20 मालिका खेळण्यासाठी पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेन ती मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली होती. त्यानंतर 2019 आणि 2020 साली दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं टी20 मालिका 1-1 आणि 2-2 अशा बरोबरीत राखल्या होत्या. त्यामुळे मालिका गमावण्याची वेळ आतापर्यंत त्यांच्यावर आली नव्हती. पण गुवाहाटीत भारतीय संघानं तो इतिहास पुसून टाकला. भारताचा धावांचा डोंगर त्याआधी भारतानं या सामन्यात दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करताना धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन रोहित शर्मानं लोकेश राहुलसह भारतीय डावाला दमदार सुरुवात करुन दिली. रोहितनं 37 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह 43 धावा फटकावल्या. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनं आपल्या टी20 कारकीर्दीतलं 20वं अर्धशतक साजरं केलं. राहुलनं अवघ्या 28 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सह 57 धावा फटकावल्या. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी साकारली.

जाहिरात

त्यानंतर सूर्यकुमार आणि विराट कोहलीनं टीम इंडियाला 200 चा पल्ला गाठून दिला. सूर्यकुमार यादवनं तर वेगवान अर्धशतक झळकावलं. त्यानं अवघ्या 18 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर 22 बॉलमध्ये 5 फोर आणि 5 सिक्ससह 61 धावा फटकावल्या. विराटनंही आपला फॉर्म कायम राखताना 28 बॉल्समध्ये नाबाद 49 धावा केल्या. तर अखेरच्या ओव्हर्समध्ये मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकनंही फटकेबाजी करताना 7 बॉलमध्ये नाबाद 17 धावा ठोकल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात