मुंबई, 20 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियामध्ये सध्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. भारतीय टीमची पहिली मॅच 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यानिमित्तानं माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे अंदाज व्यक्त केले आहेत. माजी कॅप्टन कपिल देव यांच्यानंतर सुनील गावसकर यांनी या विषयावर मत व्यक्त केलं आहे. त्यांनी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला तंबी दिली आहे. टीम इंडिया 6 ऑक्टोबर रोजी दाखल झाली. यानंतर त्यांना दोन प्रॅक्टिस आणि वॉर्मअप मॅचेस खेळण्याचीही संधी मिळाली आहे. त्यामुळे, आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला नाही तर तयारीची संधी मिळाली नाही, अशी सबब टीम देऊ शकत नाही, असं गावसकर यांनी सुनावलं आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गावसकर यांनी ‘मिड-डे’ या इंग्रजी वृत्तपत्रातील त्यांच्या कॉलममध्ये लिहिलं आहे की, ‘एक गोष्ट निश्चित आहे, तयारीच्या अभावामुळे टीम इंडियाला अपयश येणार नाही. ही टीम तीन आठवड्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियात आली आहे. त्यांनी चांगल्या टीम्सविरुद्ध प्रॅक्टिस मॅचेसही खेळल्या आहेत. या मॅचमुळे त्यांची चांगली तयारी होण्यास मदत झाली आहे. तुम्ही योग्य तयारी करण्यात अपयशी ठरलात तर अपयश स्वीकारण्यासाठी तयार असलं पाहिजे, हे टीम इंडियाला लागू होत नाही." T20 WC: टीम इंडियाच्या विजयाबाबत कपिल देव यांचं मोठं विधान; म्हणाले… ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी टीमने घरच्या मैदानावर सहा टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार जिंकलेही आहेत. यावरूनच दिसतं की खेळाडू वर्ल्ड कपसाठी कसून तयारी करत होते, हे स्पष्ट होते.’ असे गावसकर यांनी या लेखात म्हंटले आहे. टीममध्ये योग्य समतोल टीम इंडियातील दोन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीत. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि ऑल राउंडर रवींद्र जडेजा टीमबाहेर आहेत. मात्र, दुखापतींनंतरही टीम इंडियातील वातावरण चांगलं असल्याचं मत गावसकर यांनी मांडलं आहे. ‘अलीकडच्या काळात टीम इंडियानं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मग ती देशात असो किंवा परदेशात. पण, मल्टिटीम इव्हेंटमध्ये टीमला संघर्ष करावा लागत आहे. या वेळच्या टीममध्ये नवोदितांचा उत्साह आणि अनुभव या दोन गोष्टींचा योग्य समतोल आहे. इतरही टीम प्रॅक्टिस मॅचेस खेळत आहेत. पण, बुमराह आणि जडेजाच्या दुखापतीनंतरही सध्याच्या भारतीय टीममध्ये काहीतरी खास जाणवत आहे,’ असंही गावसकर म्हणाले. पाकिस्तानी अँकरसोबत विराट कोहलीचा फोटो, चाहते टेन्शनमध्ये; पाहा काय आहे नेमकं प्रकरण? 2007मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. परंतु, त्यानंतर आतापर्यंत टीमला पुन्हा ट्रॉफी जिंकता आली नाही. 2014 मध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला होता; पण श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विजेतेपदाचा हा दुष्काळ संपवण्याचं आव्हान आहे.