मुंबई, 11 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अत्यंत लाजीरवाण्या पद्धतीनं बाहेर पडली. गुरुवारी (10 नोव्हेंबर) झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट टीमचा 10 विकेट्सनं एकतर्फी पराभव झाला. या मोठ्या पराभवानंतर क्रिकेट फॅन्स आणि काही माजी खेळाडू टीम इंडियावर नाराज आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय टीममध्ये आता मोठे बदल करण्याची गरज निर्माण झाल्याचं मत या खेळाडूंनी व्यक्त केलंय. भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनी भविष्यातील टीम इंडिया कशी असेल याचा अंदाज व्यक्त केलाय. गावसकर यांच्या भविष्यानुसार, वर्ल्ड कपमधील लाजिरवाण्या पराभवानंतर काही खेळाडू टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. भविष्यात हार्दिक पंड्याकडे टीम इंडियाचं कर्णधारपद असेल, असा अंदाजहीही त्यांनी व्यक्त केला आहे. ‘जनसत्ता’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील कार्यक्रमात सामन्यानंतरच्या बोलताना सुनील गावसकर म्हणाले, ‘एक कॅप्टन म्हणून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा जिंकून हार्दिकनं त्याची क्षमता सिद्ध केलीय. यामुळे संघ व्यवस्थापन नक्कीच हार्दिक पंड्याला पुढील कॅप्टन म्हणून पसंती देईल, हार्दिक पंड्या भविष्यात निश्चितपणे भारतीय टीमचं नेतृत्व करेल आणि या दरम्यान काही खेळाडू निवृत्तीही घेतील.’ टीम इंडियाचा धक्कादायक पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन रोहितने दिलं थेट उत्तर आपल्या मुद्द्यावर जोर देऊन गावसकर म्हणाले की, ‘भारताच्या टी-20 टीममधील बहुतेक खेळाडूंचं वय 30 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते या फॉरमॅटमध्ये किती काळ खेळत राहतील याची खात्री नाही. खेळाडू याबाबत नक्कीच विचार करत असतील. टीममध्ये 30 ते 35 वयोगटातील असे अनेक खेळाडू आहेत जे टी-20 आंतरराष्ट्रीय संघातील स्वत:च्या भवितव्याचा पुनर्विचार करतील. सोशल मीडियावरही पडसाद सोशल मीडिया यूजर्सनेही गावसकर यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. आता रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांच्यासारख्या तरुण खेळाडूंना टीममध्ये संधी मिळू शकेल, असं मत फॅन्सनी व्यक्त केलंय. टीम इंडियाच्या पराभवाचे 7 व्हिलन, या खेळाडूंसाठी ‘वर्ल्ड कप’ ठरला अखेरचा! टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर ही सर्व चर्चा सुरू झाली. कारण, बॅटिंगसाठी ‘स्वर्ग’ समजल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर टीम इंडिया 20 ओव्हर्समध्ये सहा विकेट गमावून 168 रन्स करू शकली. भारतीय खेळाडू रन करण्यासाठी संघर्ष करताना दिसत होते. भारताची ओपनिंग जोडी पूर्णपणे अपयशी ठरली. त्याच खेळपट्टीवर इंग्लंडच्या ओपनर्सनी रन्सचा पाऊस पाडला.