ऍडलेड, 10 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा 10 विकेटने दारूण पराभव केला आहे. भारताने दिलेलं 169 रनचं आव्हान इंग्लंडने एकही विकेट न गमावता 16 ओव्हरमध्ये पार केलं. लेक्स हेल्सने नाबाद 86 आणि जॉस बटलरने नाबाद 80 रन केले. खराब बॅटिंग आणि खराब बॉलिंग ही टीम इंडियाच्या पराभवाची प्रमुख कारणं ठरली. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर टीमचे प्रमुख खेळाडू चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. रोहित शर्मा रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये 6 सामन्यांमध्ये 19 च्या सरासरीने फक्त 116 रन केले. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 106 चा होता. रोहितने वर्ल्ड कपमध्ये एक अर्धशतक केलं, तेदेखील नेदरलँड्सविरुद्ध. केएल राहुल टीम इंडियाच्या पराभवानंतर सर्वाधिक टीका केएल राहुलवर होत आहे. झिम्बाब्वे आणि बांगलादेशविरुद्ध अर्धशतक करणाऱ्या केएल राहुलला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध दोन आकडी धावसंख्याही करता आली नाही. राहुलने 6 सामन्यांमध्ये 21 ची सरासरी आणि 121 च्या स्ट्राईक रेटने 128 रन केले. अश्विनही फेल टीमचा सिनियर खेळाडू असलेला ऑफ स्पिनर आर.अश्विन वर्ल्ड कपच्या प्रत्येक मॅच खेळला, पण त्याला एकाही सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. 6 मॅचमध्ये त्याने 6 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीमध्ये भुवनेश्वर कुमार हा टीम इंडियाचा सगळ्यात सिनियर फास्ट बॉलर होता, पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने पहिल्या ओव्हरपासूनच रन दिल्या. ऑस्ट्रेलियामध्ये फास्ट बॉलरना मदत मिळत असतानाही भुवीने 6 मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या. अक्षर पटेल यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अक्षर पटेल 5 मॅच खेळला, यातल्या दोन सामन्यांमध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली, यात त्याने एकूण 9 रन केले. तर बॉलिंगमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या. दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दिनेश कार्तिकने टीम इंडियात कमबॅक केलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकची टीम इंडियात निवड झाली, पण यात तो अपयशी ठरला. वर्ल्ड कपमध्ये कार्तिक 4 मॅच खेळला, यातल्या 3 मॅचमध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली, पण त्याला फक्त 14 रन करता आले. मोहम्मद शमी जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे मागच्या वर्षभरापासून भारताच्या टी-20 टीममधून बाहेर असलेल्या मोहम्मद शमीचं कमबॅक झालं, पण शमीला ऑस्ट्रेलियातल्या मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांचा फायदा उचलता आला नाही. 5 मॅचमध्ये मोहम्मद शमीने 5 विकेट घेतल्या. या खेळाडूंसाठी शेवटचा वर्ल्ड कप? पुढचा टी-20 वर्ल्ड कप हा आता दोन वर्षांनी 2024 साली होणार आहे. सध्याच्या भारतीय टीममध्ये असलेले रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, आर.अश्विन, दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी हे त्यांच्या करियच्या उत्तरार्धात आहेत. तसंच त्यांची टी-20 वर्ल्ड कपमधली कामगिरीही निराशाजनक झाली आहे. रोहित शर्माचं वय हे सध्या 35, कार्तिकचं वय 37, अश्विनचं वय 36 वर्ष आहे, त्यामुळे हे खेळाडू पुढचा टी-20 वर्ल्ड कप खेळतील का नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.