जपानकडून जर्मनीचा पराभव
दोहा-कतार, 23 नोव्हेंबर: फिफा वर्ल्ड कपमध्ये सौदी अरेबियानं मंगळवारी अर्जेन्टिनासारख्या बलाढ्य संघाला हरवण्याचा पराक्रम गाजवला. याच स्पर्धेत आज आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. 4 वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकलेल्या जर्मनीला जपाननं चांगलाच तडाखा दिला. ग्रुप E मधल्या या सामन्यात जपाननं जर्मनीला 2-1 अशा फरकानं हरवून सनसनाटी विजयाची नोंद केली. आशियाई संघांचा दणका सौदी अरेबिया आशियातली पहिलीच टीम ठरली होती जिनं अर्जेन्टिनासारख्या बलाढ्य संघाला धूळ चारली. त्यानंतर आणखी एका आशियाई संघानं फिफा वर्ल्ड कपमध्ये चक्क माजी विश्वविजेत्या जर्मनीला पराभूत केलं.
आधी आघाडी, मग पराभव काल अर्जेन्टिनाचा ज्या पद्धतीनं पराभव झाला तसाच पराभव आज जर्मनीला स्वीकारावा लागला. 33 व्या मिनिटाला पेनल्टी किकवर आज जर्मनीला पहिला गोल करुन आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहिल्या हाफपर्यंत 1-0 अशी जर्मनीकडे आघाडी होती. 74 व्या मिनिटापर्यंत जर्मनीनं ही आघाडी टिकवली होती. पण 75 व्या मिनिटाला जपानच्या रित्सु दोआननं जपानला बरोबरी साधून दिली. पण त्यानंतर पुढच्या आठच मिनिटात जर्मनीला दुसरा धक्का बसला तो तकुमा असोनोच्या गोलमुळे. असोनोनं गोल करताच जर्मन प्रेक्षकांना धक्काच बसला. त्यात पुढच्या राहिलेल्या काही मिनिटांमध्ये जर्मनीनं आक्रमक खेळ करुनही जपानचा बचाव भेदता आला नाही. त्यामुळे सलामीच्याच लढतीत पराभव स्वीकारण्याची वेळ जर्मनीवर आली.
अर्जेन्टिनाचा असाच पराभव काल अर्जेन्टिनालाही अशाच पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मेसीनं पेनल्टी किकवरच गोल करत अर्जेन्टिनाला दहाव्या मिनिटालाच आघाडी मिळवून दिली होती. पण 48 आणि 53 मिनिटाला सौदी अरेबियानं दोन गोल करत अर्जेन्टिनाला पराभवाचा धक्का दिला होता. जर्मनीच्या बाबतीतही आज अगदी असंच घडलं. हेही वाचा - FIFA WC 2022: केरळात फुटबॉल फॅन्सचा वेगळाच स्वॅग! अर्जेंटिना-ब्राझीलचे चाहते भिडले; हाणामारीचा Video Viral जर्मनीची नौका संकटात? दरम्यान 2018 साली पहिल्याच मॅचमध्ये झालेल्या पराभवामुळे जर्मनीचं आव्हान साखळी फेरीतच समाप्त झालं होतं. यंदाही जर्मनीसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. जर्मनीच्या गटात स्पेन आणि कॉस्टा रिका हे अन्य दोन संघ आहेत. त्यात आता स्पेनचं कडवं आव्हान परतवून लावणं जर्मनीसाठी महत्वाचं ठरणार आहे. अन्यथा यंदाही जर्मनीला पहिल्याच फेरीतून बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे.