अर्जेन्टिनाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का
दोहा-कतार, 22 नोव्हेंबर: कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये आज एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानं यंदा कतारमध्ये दाखल झालेल्या अर्जेन्टिनाच्या मोहिमेला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला. सौदी अरेबियाविरुद्धच्या C ग्रुपमधल्या पहिल्याच मॅचमध्ये अर्जेन्टिनाला 1-2 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला. महत्वाचं म्हणजे पहिल्या हाफच्या निर्धारित वेळेपर्यंत (45 मिनिटं) अर्जेन्टिना 1-0 अशा फरकानं आघाडीवर होती. पण ती आघाडी अर्जेन्टिनाला टिकवता आली नाही. त्यानंतर सौदी अरेबियानं दोन गोल करत अर्जेन्टिनाला पराभवाचा मोठा धक्का दिला.
मेसीचा गोल पण…. अर्जेन्टिनाचा स्टार फुटबॉलर लायनल मेसीनं 10 व्या मिनिटालाच अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली. आपला पाचवा वर्ल्ड कप खेळणाऱ्या मेसीला पेनल्टी किकवर गोल करण्याची आयती संधी मिळाली आणि त्यानं ती चुकवली नाही. पण त्यानंतर सौदी अरेबियाच्या सालेहनं 48 व्या मिनिटाला गोल करुन पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधली. त्यानंतर दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच सौदीच्या सलीमनं दुसरा गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. सौदीच्या भक्कम बचावासमोर त्यानंतर अर्जेन्टिनाला बरोबरीची संधीच मिळाली नाही. आणि अर्जेन्टिनाला एका नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात सौदीनं मिळवलेला हा तिसराच विजय ठरला. पण अर्जेन्टिनाला हरवल्यानं हा विजय त्यांच्यासाठी फार महत्वाचा ठरला.
हेही वाचा - FIFA WC 2022: इराणच्या टीमचा राष्ट्रगीत गायनास नकार, फिफा वर्ल्ड कपच्या मैदानात पाहा नक्की काय घडलं? अर्जेन्टिनाची वाट बिकट? अर्जेन्टिनाचा समावेश असलेल्या ग्रुप C मध्ये सौदी, मेक्सिको आणि पोलंडचा समावेश आहे. त्यामुळे मेक्सिको आणि पोलंड संघात अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे अर्जेन्टिनाला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी आता दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. असं झालं नाही तर अर्जेन्टिनाला साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागू शकतो.